मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) सोमवारी सप्टेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत बुडीत कर्जात घट आणि नक्त व्याजापोटी उत्पन्नात वाढीमुळे निव्वळ नफ्यात दुपटीने वाढून ५३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बँकेने २६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकेच्या सकल अनुत्पादित मालमत्तांचे (बुडीत कर्ज) प्रमाण वर्षांपूर्वीच्या ५.५६ टक्क्यांच्या पातळीवरून, सप्टेंबर २०२२ अखेर ३.४० टक्के असे लक्षणीय घसरले आहे. त्याचप्रमाणे, बँकेची नक्त बुडीत कर्जेही १.७३ टक्क्यांवरून, ०.६८ टक्क्यांवर आली आहेत. परिणामी, दुसऱ्या तिमाहीसाठी बुडीत कर्जासाठी तरतुदीतदेखील वर्षांपूर्वी याच तिमाहीसाठी निर्धारित केलेल्या ९२२ कोटी रुपयांवरून ५३२ कोटी रुपयांवर घसरण झाली आहे. तिमाहीतील आर्थिक कामगिरीबद्दल बोलताना, महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव म्हणाले की, नक्त व्याजापोटी उत्पन्नातील वाढीसह, विविध निकषांवर सुधारलेल्या कामगिरीमुळे नफ्यात वाढ होऊ शकली आहे.

बँकेचे सरलेल्या तिमाहीतील एकूण उत्पन्न वाढून ४,३१७ कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ४,०३९ कोटी रुपये होते. पैकी निव्वळ व्याज उत्पन्न गेल्या वर्षीच्या १,५०० कोटी रुपयांच्या तुलनेत २५.८४ टक्क्यांनी वाढून १,८८७ कोटी रुपये झाले आहे.

बुडीत कर्जात ५०० कोटींनी घट शक्य

नव्याने स्थापित ‘बॅड बँक’ अर्थात नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे बुडीत कर्जे हस्तांतरित करण्याबाबत विचारले असता, महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी हस्तांतरणासाठी दोन-तीन बडय़ा रकमेची थकीत खाती निश्चित केली असल्याचे सांगितले. ज्यामुळे विद्यमान तिसऱ्या तिमाहीत बुडीत कर्जात ५०० कोटी रुपयांनी घट साधता येईल. या खात्यांमधून सुमारे १७० कोटी रुपयांची वसुली अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले. बँकेचे सकल कर्ज वितरण सप्टेंबर २०२२ अखेरीस २८.६२ टक्क्यांनी वाढून १,४८,२१६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

समभागाची उसळी

तिमाहीतील दमदार वित्तीय कामगिरीचे स्वागत म्हणून भांडवली बाजारात सोमवारी महाबँकेच्या समभागाला मोठी मागणी मिळाली आणि त्या परिणामी समभाग सहा टक्क्य़ांनी उसळला. मुंबई शेअर बाजारात तो ५.८४ टक्के वाढीसह १९ रुपयांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजारात ५.५७ टक्के वाढीसह १८.९५ रुपये पातळीपर्यंत वधारला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of maharashtra net profit doubles in quarter 2 zws