आयातीला आलेले उधाण फार काळ टिकणार नाही़  त्यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी़ चिदम्बरम यांनी बँकांना दिला आह़े  सोन्यावरील आयात शुल्क ८ टक्क्यांपर्यंत वाढविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय बँक महासंघाच्या (आयबीए) वार्षिक सर्वसाधारण सभेत चिदम्बरम यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आह़े
चिदम्बरम पुढे म्हणाले की, ग्राहकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी करण्यात बँकांना मोठी भूमिका बजावायची आह़े  त्यामुळे मी सर्व बँकांना विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या सर्व शाखांना सुवर्ण खरेदी आणि गुंतवणुकीसाठी ग्राहकांना प्रोत्साहन न देण्याचा सल्ला द्यावा़
रिझव्‍‌र्ह बँकेने याआधीच बँकांना सोन्याच्या नाण्यांची विक्री नियंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे, त्याची आठवण करून देत चिदम्बरम म्हणाले की, असा दिवस येण्याची आशा वाटते जेव्हा आपण सोन्यालाही इतर धातूंप्रमाणेच एक धातू मानू, जो केवळ चांदी-तांब्यापेक्षा अधिक चमकतो इतकेच़
सोन्याची वाढती आयात देशाच्या चालू खात्यावरील तूटीत मोठी भर टाकत आह़े  त्यामुळे सोन्याची आयात नियंत्रित करण्यासाठी शासनाने सोने आणि प्लॅटिनमच्या आयातीवरील कर दोन टक्क्यांनी वाढविला आह़े  सोन्याच्या आयात शुल्कावर गेल्या सहा महिन्यांत करण्यात आलेली ही दुसरी वाढ आह़े  जानेवारीमध्ये शासनाने हे आयात शुल्क ४ वरून ६ टक्क्यांवर आणले होत़े
वाटत्या कॅडबद्दल चिंता व्यक्त करीत अर्थमंत्री म्हणाले की, सोन्याची आयात वाढत्या कॅडला मोठा हातभार लावीत आह़े  सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने लाखो लोक आनंदात आहेत़  परंतु, त्या लाखो लोकांमध्ये मी नाही़  मी चिंतेत आह़े  जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण ही भारतासाठी वाईट बातमी असल्याचे मी आरबीआयच्या गव्हर्नरांनाही सांगितले आह़े आणि आमची भीती खरी ठरली़  एप्रिल – मेमध्ये सोन्याची विक्री वाढली़
याबद्दल माहिती देताना अर्थमंत्री म्हणाले की, एप्रिलमध्ये भारताने १४२ टन सोन्याची आयात केली होती़  तर मे महिन्यात सोन्याच्या आयातीचे प्रमाण १६२ टन इतके होत़े  गेल्या वर्षी सोन्याच्या आयातीचे मासिक प्रमाण ७० टन होत़े  मग आपण कसा टिकाव धरू शकणार? या सुवर्ण खरेदीला आपण वित्तसाहाय्य तरी कसे करणार? असे प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केल़े
त्यामुळे या सुवर्ण आयातीला चाप लावण्यासाठी कडक पाऊल उचलण्याविना आरबीआय किंवा शासनाला कोणताही पर्याय नाही़  त्यामुळे आरबीआयने मागणीनुसारच सोन्याची आयात करण्याचे बंधन घातले आह़े  तसेच तारणही शंभर टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आह़े परकीय गंगाजळीला हातही न लावता, भारत आपले कॅड परकीय गुंतवणुकीतून फेडू शकेल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला़  चलन फुगवटय़ात होणारी घटही सोने खरेदीवरील लक्ष्य दुसरीकडे वळवू शकेल, असेही मत त्यांनी व्यक्त केल़े वाणिज्य बँकांना वित्तमंत्र्यांनी विनंती केली की, कंपन्या आणि कर्जदारांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देऊन वित्तीय धोरणे प्रत्यक्षात आणावीत़  जीडीपीच्या तुलनेत २०१२-१३ या वर्षांत वित्तीय तुटीचे प्रमाण ४.९ पर्यंत खाली आल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, वित्तीय तुटीचे येत्या वर्षांतील ४.८ टक्के उद्दिष्ट सहज साध्य असल्याचेही त्यांनी सांगितल़े

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोने आणखीच चढले!
आयात शुल्कात आणखी २ टक्क्यांनी वाढ करून ते ८ टक्क्यांवर नेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा परिणाम म्हणून मुंबई सराफ बाजारात स्टँडर्ड सोने तोळ्यामागे एकदम ४६५ रुपयांनी वाढून २७५७० अशा दोन महिन्यांपूर्वीच्या उच्चांकावर चढले. आयातशुल्क वाढल्याने किमती भडकतील या भीतीने आभूषणनिर्माते, साठेबाज आणि ग्राहकांनी खरेदीसाठी गुरुवारी जोर मारल्याने सोन्याच्या भावात अकस्मात झळाळी चढली. चांदीही आज किलोमागे ३०० रुपयांनी वाढून ४५,२९५ रुपयांना पोहचली.

चिदम्बरम उवाच..!
रुपया लवकरच स्थिर होईल
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत काही अंशी घसरली असली, तरीही चिंतेचे कारण नाही़  लवकर रुपयाची किंमत स्थिर होईल, असा आशावाद अर्थमंत्री पी़  चिदम्बरम यांनी व्यक्त केला आह़े  गेल्या दोन महिन्यांपासून परदेशी चलनाची आवक चांगली असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केल़े  गेल्या आठ दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत १५० पैशांनी खालावली होती़  गुरुवारी सकाळी चलन बाजारातील व्यवहाराच्यावेळी ही किंमत ५६.८९ इतकी होती़  दुपारच्या सुमारास ती भयंकर ५७ इतकी घसरली.़  बँका आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यामुळे गेल्या ११ महिन्यांमध्ये पहिल्यांदाच रुपयाची किंमत इतकी खालावली़  गेल्या जूनमध्ये रुपयाची किंमत ५७.३२ पर्यंत विक्रमी खालावली होती़  
रब्बी पिकांमुळे खाद्यान्नाच्या किमती कमी होतील
सध्या खाद्यान्नाच्या किमती वाढल्या आहेत़  परंतु लवकरच रब्बी पिके बाजारात येतील आणि खाद्यान्नाच्या किमती कमी होतील, असेही चिदम्बरम यांनी या वेळी सांगितल़े घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकांतील वाढ आणि एकंदरीत चलन फुगवटा लक्षणीयरीत्या कमी झाला आह़े  ग्राहक किमतीवर आधारित निर्देशांकांतील वाढ मात्र अद्याप ओसरली नसली तरी त्यातही सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितल़े  खाद्यान्नाच्या किमती एप्रिलमध्ये ६.८ टक्क्यांनी वाढल्या होत्या, तर घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकांतील वाढ मात्र एप्रिलमध्ये ४.८९ अशी दिलासादायी कमी होती़  हा दर तीन वर्षांतील सर्वात कमी दर आह़े  ग्राहक किमतीवर आधारित निर्देशांक मात्र एप्रिलमध्ये ९.३९ टक्क्यांपर्यंत वाढला होता़
रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदारातील कपातीचा लाभ ग्राहकांनाही मिळू द्या
आर्थिक आलेख उंचावण्यासाठी गुंतवणूक वाढावी म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरात केलेल्या कपातीचा लाभ ग्राहकांनाही देण्याचे आवाहन अर्थमंत्र्यांनी बँकांना केले. सेवा क्षेत्र आणि कॉर्पोरेट कर्जदारांनाही त्याचा लाभ मिळायला हवा. २०१२ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर १.२५ टक्क्यांनी कमी केला आह़े  मात्र वाणिज्य बँकांनी केलेली कपात केवळ ३० टक्क्यांची होती, असेही त्यांनी नमूद केल़े

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi advised banks not to sell gold coins p chidambaram