आज अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थसंकल्प हा आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाचा ‘वळणिबदू’ असतो. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यावर तटस्थपणे आपण जसे ‘नाण्याच्या दोन्ही बाजू’ समजून घेतो तसे बाजाराच्या दृष्टीने तेजी/मंदीची बाजू समजून घेऊ या.

कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल, चीनची ढासळती अर्थव्यवस्था, डॉलरचे चढे तर कच्च्या तेलाचे घसरणारे दर या सर्वाचा परिणाम म्हणजे निर्देशांकानी- निफ्टी निर्देशांकाने ६८६९ अंश/ सेन्सेक्सने २२,६०० अंशांचा नीचांक गाठला. ४ मार्च २०१५च्या सार्वकालिक उच्चांकापासून एका वर्षांत निर्देशांकांनी ही २४ टक्क्य़ांची घसरण दाखविली.

आज जी निर्देशांकात नीचांकापासून वाढ होत आहे त्याला खालील दृष्टिकोनातून बघितले पाहिजे.

१. निर्देशांकात २४% ची जी घसरण झाली आहे, त्यामुळे निर्देशांकांनी तळ गाठून आता बाजारामध्ये दीर्घकालीन सुधारणा होणार का?

अथवा

२. निर्देशांकाची जी सुधारणा चालू आहे ती अल्पकाळ टिकून (रिलीफ रॅली) पुन्हा फिरून निर्देशांक नवीन नीचांक गाठणार काय? या वाचकांच्या/गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांकडे आपण थेट वळू या.

आज अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थसंकल्प हा आíथक क्षेत्रातील महत्त्वाचा ‘वळणिबदू’ असतो. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यावर तटस्थपणे आपण जसे ‘नाण्याच्या दोन्ही बाजू’ समजून घेतो तसे बाजाराच्या दृष्टीने तेजी/मंदीची बाजू समजून घेऊ या.

अर्थसंकल्प सादर झाल्यावर खालील कारणाने तेजीची पालवी फुटू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आíथक विधेयकांवर राज्यसभेत वारंवार अडवणूक होत असल्याने याच अर्थसंकल्पात येणाऱ्या दोन-तीन वर्षांच्या आíथक सुधारणा सादर केल्यास बाजारामध्ये तेजीची धारणा निर्माण होऊन निर्देशांकाचा अवघड अडथळा ७५५०/२४९०० पार करून निर्देशांक ७८००-८००० / २६५०० ते ८५००-८६०० / २८५००पर्यंत झेपावेल (इथे निर्देशांक ७५५०/२४९०० च्यावर १० दिवस टिकणे नितांत गरजेचे आहे. तरच वरील उद्दिष्टे साध्य होतील, हे अल्प मुदतीसाठी झाले.

दीर्घ मुदतीसाठी निर्देशांक ८०००/२६४०० (२०० दिवसांची चलत सरासरी)च्या वर १० दिवस टिकणे नितांत गरजेचे आहे. तरच ८५००-८६०० हे पहिले उद्दिष्ट व नंतर ते ९१००/३०००० पर्यंत निर्देशांक झेप घेऊ शकेल. हा निर्देशांकांचा तेजीचा आढावा झाला.

नाण्याची दुसरी बाजू

अर्थसंकल्प बाजाराच्या दृष्टीने क्रांतिकारक न राहता ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत ठेवला, तर मग मात्र फिरून मंदीचे आवर्तन सुरू होईल व या घातक उतारात अगोदरचे भरभक्कम आधार ७२५०/२३८६२ व नंतर ६८६९/२२६०० तोडले तर मग मात्र निर्देशांक दुर्दैवाने ६६०० ते ६६५०/२२३०० व घातक उताराचा अतिरंजितपणा (अ‍ॅबरेशन) ६३५०/२१२०० असेल, जो २००८चा उच्चांक हा आता निर्देशांकाचा भरभक्कम आधार असेल. या पातळ्यांवर बाजाराचा दीर्घकालीन तेजीचा पाया रचला जाईल ती कारणे खालीलप्रमाणे :

१. बाजारामधील समभागाची खरेदी ही प्रामुख्याने दोन गोष्टीवर होते. कंपनीचा विकास / वृद्धीदर हा सातत्याने १५ ते २०% असेल तसेच भरघोस नफा होत असेल तर गुंतवणूकदारांना समभाग खरेदीचे आकर्षण वाटते.

अथवा , बाजारामधील समभागाचे मूल्य एवढय़ा रसातळाला पोहोचते की, भविष्यकालीन मूल्यांकन अतिशय आकर्षक होते. जेव्हा निर्देशांक ५७००/२४७००वर होता, तेव्हा बाजाराचे किंमत व उत्पन्न गुणोत्तर (पी/ई रेशो) हे १५ वर होते. जर भविष्यकाळात दुर्दैवाने निर्देशांकांनी ६८६९/२२६००चा भरभक्कम आधार तोडला तर निर्देशांक प्रथम ६६००-६६५०/२२३०० व घातक उताराचा अतिरंजितपणा (अ‍ॅबरेशन) ६३५०/२१२०० असेल. इथे मात्र बाजाराचा पी/ई रेशो हा १२ ते १३च्या दरम्यान असेल व आघाडीच्या कंपन्यांचे मूल्यांकन हे दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आकर्षक असेल.

२. बँकांचे समभाग कोसळण्यामागे बँकांची बुडीत व वाढणारी अनुत्पादित कर्जे (एनपीए) व त्याची तरतूद करण्यात बँकांचा नफा वळवला जात आहे, हे कारण आहे. पण जून २०१६पर्यंत बुडीत कर्जाचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होइल व केंद्र सरकारने अगोदर जाहीर केल्याप्रमाणे ४० हजार कोटींचे तत्काळ व वर्षभरात एक लाख पन्नास हजार कोटीचे भांडवल बँकांना पुरवले तर याच सरकारी बँका आíथकदृष्टय़ा सुदृढ होतील.

३.  आपले सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) हे ७% दराने वाढत आहे, जे आजही पाश्चिमात्य व युरोपीय देशांपेक्षा अतिशय आकर्षक आहे.

४. येणाऱ्या दिवसात कच्चे तेल ३० ते ४० डॉलर प्रति पिंप किमतीदरम्यान राहील, तर ते भारतीय अर्थव्यवस्थेतील चालू खात्यावरील तूट व अर्थसंकल्पीय तूट आवाक्यात राहण्यास मदतकारक ठरेल.

५. आताच्या तिमाही निकालात कंपन्यांचा वृद्धीदर हा जेमतेम ५ ते ७% येत आहे व भविष्यकाळात २०१७-१८ मध्ये हाच वृद्धीदर १५% वर जाईल असे भाकीत आहे.

त्यामागचे गृहीतक खालीलप्रमाणे-

आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मूलभूत कच्चा माल हा अतिशय स्वस्तात मिळत आहे. मग त्यात लोखंड, पोलादासारखे धातू असोत की तेलाधारित नसíगक वायू, रंग, प्लास्टिक असो याचा फायदा अतिविशाल कंपन्या घेणार. या कंपन्यांची साठवणूक क्षमता प्रचंड असल्याने स्वस्तात कच्चा माल घेऊन आता व्यापारउदिमाचे चक्र, आíथक चक्र आता जे मंदीत आहे ते जेव्हा तेजीकडे वळायला लागल्यावर याच कच्च्या मालाच्या किमती भरीव स्वरूपात वाढायला लागतील. पण या कंपन्यांच्या साठवणूक क्षमतेमुळे या कंपन्यांचा उत्पादन खर्च हा इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त राहील ज्याचा सुपरिणाम म्हणून ताळेबंदातील बॉटमलाइन म्हणजे नफा भरीव प्रमाणात वाढेल. ज्यामुळे कंपनीचे किंमत व उत्पन्न गुणोत्तर (पी/ई रेशो) व प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) आकर्षक होतील व याच पाश्र्वभूमीवर भारतात घडणारे ‘मेक इन इंडिया’चे नेत्रदीपक करार – हे लालफितीत, दफ्तर दिरंगाईत न अडकता या सर्व करारांची काटेकोर, जलदगतीने अंमलबजावणी केल्यास माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ डॉ. कलामांचे भाकीत खरे ठरेल, ते म्हणजे- सन २०२० मध्ये ‘भारत ही महासत्ता असेल.’

जर २०२०मध्ये भारत महासत्ता होणार असेल तर त्या महासत्तेचा भांडवली बाजार मरगळलेला कसा? लेखाचा शेवट भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या सुखद भाकिताने करावासा वाटतो.

ऑस्ट्रेलियन वेधशाळेने भाकीत वर्तविले आहे की, या वर्षी भारतात भरपूर तरी समतोल असा धो-धो पाऊस कोसळणार आहे.

पावसाच्या या कोसळण्याने अगोदरच कोसळून पडलेल्या बाजाराला मात्र दमदार उभारी मिळेल.

सूचना : सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लेखक जाहीर करू इच्छितो की, सदर लेख कोणत्याही अर्थाने गुंतवणुकीची शिफारस नाही. माझी अथवा माझ्या जवळच्या नातेवाईकांची निफ्टी स्पॉटमध्ये कुठलीही गुंतवणूक नाही. गुंतवणूकदारांनी निफ्टीवरील खरेदी-विक्री, समभागांची खरेदी-विक्री ही आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानुसार करावी.
आशीष अरविंद ठाकूर – ashishthakur1966@gmail.com