छत्रपती संभाजीनगर : भरधाव मोटारीने सहा जणांना धडक दिली. यात एक जण जागीच ठार झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ ते सव्वानऊच्या सुमारास सिडको एन १ भागातील भक्ती गणेश मंदिरासमोर घडली. गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मंदिराचे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.

या अपघातात मनीषा विकास समधाने (वय ४०), विकास समधाने (वय ५०), रवींद्र भगवंतराव चौबे (वय ६५), श्रीकांत प्रभाकर राडेकर (वय ६०) आणि दिगंबर जगन्नाथ तोर (वय ४५) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, अपघातास जबाबदार असलेला मोटारचालक प्रशांत एकनाथ मगर (वय ३०, रा. सिडको एन १) यास अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

सिडको एन १ परिसरातील सर्व्हिस रोडलगत असलेल्या भक्ती गणेश मंदिरात सकाळी भाविकांची दर्शनासाठी नेहमीप्रमाणे वर्दळ होती. सव्वानऊच्या सुमारास काही भाविक मंदिरासमोर, परिसरात उभे होते. तर, काही जण दर्शनासाठी मंदिर आवारात जाण्याच्या तयारीत असतानाच मंदिराच्या दिशेने एक मोटार (एमएच २० एचएच ०७४६) वेगाने आली. चालक हयगयीने व बेदरकारपणे मोटार चालवत आपल्याच दिशेने येत असल्याचे काही भाविकांच्या लक्षात आले. त्यांनी स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात दोन ते तीन जण थोडक्यात बचावले; परंतु सहा जणांना संधी मिळाली नाही. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.