छत्रपती संभाजीनगर : घराणेशाहीचे कितीही आरोप झाले तरी नेत्यांची मुले आता नगरपालिका आणि महापालिकेच्या तयारीत गुंतलेत आहेत. उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांमध्ये माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, शिवसेना चंद्रकांत खैरे यांचे पूत्र ऋषीकेश हेही निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. आमदार अब्दुल सत्तार सुपूत्र समीर यांच्यासाठी पुन्हा प्रचारात उतरले आहेत.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर होत असून, करोना, राजकीय उलथा-पालथी, ओबीसी आरक्षणाचा न्यायालयात पोहोचलेला मुद्दा, अशा अनेक कारणांमुळे निवडणूक लांबत गेली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक घोषित झाली असून, मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे.

११ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेकडून आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. सोडतीनुसार २९ प्रभागांमधून ११५ सदस्य निवडून द्यायचे असून, ५८ महिला आणि ५७ पुरुष सदस्यांच्या नव्या रचनेने महापालिकेची कार्यकारिणी अस्तित्वात येईल.

नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी अनेक नवे चेहरे दिसतील. सर्वच पक्षांमधील नेत्यांकडून आपल्या घरातील मुलगा, मुलगी, भाऊ अशा सदस्यांना उमेदवारी मिळवून देण्याची तयारी असून, त्या दृष्टीने इच्छित प्रभागांमध्ये काम करण्यास सुरुवात झाली आहे.

आपण प्रभाग १७ मधून महापालिकेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. – हर्षवर्धन भागवत कराड</strong>

महापालिकेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण पक्षाने आदेश दिला तर! लोकांची कामे करण्याला कायम प्राधान्य असते. – ऋषी खैरे

मनपाची प्रभाग निवडणूक आपण लढवणार नाही. आपले काका लढण्याची शक्यता आहे. एकाच घरात दोघांना उमेदवारी असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे आपण लढण्याची कुठलीही तयारी केलेली नाही. – ॲड. धर्मराज अंबादास दानवे</strong>

आपण प्रभाग १६ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत. संघटनात्मक पातळीवर काम केलेले आहे. आता लोकसेवक म्हणून काम करायचे आहे. आपले वडील आमदार असले तरी भाजप हा परिवारवादी पक्ष नसून, येथे सर्व्हे करून आणि कौशल्याधारित कामानुसार उमेदवारी मिळते. – हर्षवर्धन संजय केणेकर