औरंगाबाद : औरंगाबाद शहरात करोना विषाणूबाधित एक रुग्ण आढळल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत पाच जणांना स्वतंत्र अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाला कळविले आहे. दरम्यान, राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत पाठविलेल्या १०९ लाळेच्या नमुन्यांपैकी ५३ जणांचे अहवाल नकारात्मक आले होते. त्यात ४९ अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. औरंगाबादच्या साई केंद्रात आता शुकशुकाट आहे. केवळ मोजकेच खेळाडू येथे आहे. मात्र, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील गर्दी अजूनही कमी झालेली नाही. तसेच परदेशातून आलेले नागरिक प्रशासनाकडे आपली नोंद देण्याबाबत हात आखडून असल्याचेही दिसून येत आहे. तसे करू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले जात आहे.

गुरुवारी मराठवाडय़ात १ हजार २८ जणांचे विलगीकरण करण्यात आले होते, तर १८ जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलेल्या रुग्णांमध्ये परभणी जिल्ह्य़ात ११, औरंगाबाद जिल्ह्य़ात पाच तर हिंगोली, नांदेड या जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण स्वतंत्र अलगीकरण कक्षात दाखल आहे. विविध ठिकाणी विलगीकरण केलेल्यांची संख्या आता १०२८ एवढी असून औरंगाबादमध्ये ७९७ असून त्यात १७ जण विदेशी नागरिक आहेत. जालन्यामध्ये २३, परभणीत २९, हिंगोलीत दोन, नांदेडमध्ये ८२, लातूरमध्ये २६, उस्मानाबादमध्ये ६५ आणि बीडमध्ये चौघांचा समावेश आहे.

पुढील पाच-सहा दिवस अधिक  महत्त्वाचे

परदेशात जाऊन आलेल्यांनी स्वत:हून प्रशासनाला माहिती द्यावी आणि १४ दिवस स्वत:ला  विलग ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या विषाणूंचा सुप्त अवस्थेतील कालावधी १४ दिवस असल्याने तोपर्यंत लक्षणे आढळली नाहीत तर तो व्यक्ती रुग्ण नाही, हे सिद्ध होईल. येते पाच-सहा दिवस अधिक महत्त्वपूर्ण असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.