छत्रपती संभाजीनगर : आज ना उद्या दर वाढतील, अशी आशा बाळगून घरातच अनेक महिने साठवून ठेवलेल्या कापसाला शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही कमी दराने विक्री करावे लागले. परिणामी शेतकऱ्यांच्या दराच्या आशेवर बोळा फिरल्यानंतर यंदा मात्र, त्यांनी चार महिन्यात येणाऱ्या कापसाऐवजी तीन महिन्यात येणाऱ्या मक्याला अधिक पसंती दिल्याचे दिसत आहे. गतवर्षी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये कापसाचे पेरणी क्षेत्र ९ लाख १८ हजार ४ हेक्टर एवढे क्षेत्र होते.
गत हंगामात कापसाचा हमीभाव सात हजार १२१ रुपये होता. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना साडे सहा हजारांच्या आसपासच दराने कापूस खासगी जिनिंग व्यावसायिकांकडे विक्री करावा लागला. दर वाढतील, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी बरेच दिवस घरातच कापूस साठवून ठेवला. परंतु अपेक्षित दर शेवटपर्यंत मिळाला नाही. शिवाय कापसाच्या वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याच्या अडचणीला तोंड देता-देता शेतकऱ्यांना बाजारात दराबाबत तडजोड करावी लागली. वेचणीसह फवारणी आदींवरचा खर्चही शेतकऱ्यांना परवडेना झाला होता.
करोना काळानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीमध्ये कापसाचे दर १३ ते १४ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. करोना ओसरू लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून कापसाची मागणीही वाढलेली होती. परिणामी दरही चांगला मिळाला. केंद्रीय कापूस निगमकडून मोठी खरेदी झालेली होती. परंतु त्यानंतर तेवढा दर मिळालेला नाही. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत ४० टक्क्यांपर्यंतच पेरणी झालेली आहे. बीडमध्ये ६० टक्क्यांवर पेरणी झालेली असली तरी कापसाऐवजी तूर, मका, सोयाबीन, ऊस या पिकाला अधिक शेतकरी पसंती देत आहेत.
दरवर्षी गावात कापसाची अधिक पेरणी व्हायची. यंदा शिवराई (ता. वैजापूर) या आमच्या गावात ८० टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. कापसासाठी मजुरांची मोठी समस्या उभी राहिली आहे. मध्यप्रदेशातून मजूर आणून वेचणी करावी लागली. कापसाचे दरही परवडले नाहीत. त्या तुलनेत मका परवडत असून, तीन महिन्यात पीक हाती येते. – भाऊसाहेब पाटील, शेतकरी.
वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापसाऐवजी मका, तूर या पिकांकडे प्रथमदर्शनी ओढा दिसत आहे. कापसाच्या वेचणीला मजूर मिळत नसल्याची ते अडचण सांगत आहेत. तीन महिन्यात येणारे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जात आहे. – विशाल साळवे, कृषी अधिकारी, वैजापूर.
क्षेत्र ५० हजार हेक्टर घटण्याची शक्यता
संभाजीनगर जिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र ५० हजार हेक्टरने घटण्याची आणि त्या बदल्यात मका, तूर व सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. कापसाची बियाणे विक्री पाहूनच क्षेत्र घटेल, असा अंदाज दिसतो आहे. – डाॅ. प्रकाश देशमुख, सहसंचालक, कृषी.