छत्रपती संभाजीनगर : तीन हजार ७०० कोटींचा गैरव्यवहार, तब्बल ७४ गुन्हे दाखल असणाऱ्या ज्ञानराधाच्या अर्चना कुटे यांना पुण्यातून अटक झाल्यानंतर मराठवाड्यातून ठेवीदारांमध्ये प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या आरोपींना पकडावे म्हणून संघर्ष समिती स्थापन करुन पाठपुरावा सुरू करण्यात आला होता. मागील महिन्यामध्ये मंत्रालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत तसेच गृह विभागाचे सचिव इक्बाल सहेल यांच्यासोबत तीन बैठका पार पडल्या. या बैठकांनंतर सरकार आणि प्रशासन स्तरावरील कार्यवाही गतिमान झाल्या. आरोपीस अटक झाली असल्याने फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होते, असा पहिला संदेश गेल्याचे मानले जात आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या राज्यात ५१ तर इंदौर येथे एक अशा मिळून ५२ शाखा आहेत. या बहुराज्यीय वित्तीय संस्थेवर प्राप्तिकर विभागाने टापा टाकला होता. या छाप्यांमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट व कुटे समूहाच्या संचालिका अर्चना कुटे यांना मंगळवारी दुपारनंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. त्यांच्यासोबत अन्य एका महिलेलाही जेरबंद करण्यात आले आहे.
हातावरचे पोट असलेले साडेचार लाख ठेवीदारांच्या रक्कम लूट करण्यात आली. या प्रकरणी कुटे समुहावर राज्यभरात एकूण ७४ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे वर्षभरापेक्षाही अधिक कालावधीपासून ज्ञानराधा मल्टीस्टेट व कुटे ग्रुपच्या संस्थांमधील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आली होती. गतवर्षी कुटे समूहाच्या अनेक संस्थांवर प्राप्तिकर विभागाचे छापेही पडले होते. या प्रकरणी कुटे समूहाचे प्रमुख सुरेश कुटे, अर्चना कुटे, आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांवर बीड जालना लातूर धाराशिव परभणी आदी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. गैरव्यवहाराशी संबंधित हे गुन्हे दाखल असून जून २०२४ मध्ये सुरेश कुटे आशिष पाटोदकर यांना अटक करण्यात आली आहे. मात्र अर्चना कुटे या तेव्हा निसटल्या. त्याचीही माध्यमांमधून बरीच चर्चा झाली.
पोलीस विभागातीलच एका अधिकाऱ्याच्या मर्जीनेच अर्चना कुटे निसटल्याचा आरोप करण्यात येत होता. शिवाय सुरेश कुटे यांनी भाजपमध्येही प्रवेश केला होता. त्यामुळे अर्चना कुटेंबाबत झालेल्या आरोपाला अधिकच बळ मिळाले होते. या प्रकरणी लाखो ठेवीदार मात्र अडचणीत आले होते. ठेवीदारांचा प्रचंड संताप प्रशासनावरही होता. प्रशासन व सरकारकडूनही कुटे दाम्पत्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही झाला होता. ठेवीदारांची एक संघर्ष समितीही स्थापन झाली आहे. त्यातून लाखो लोकांमधील नाराजी लक्षात घेऊन मंत्रालयामध्ये मागील महिन्यांत काही बैठका पार पडल्या. कुटे समूहाची मालमत्ताही जप्त करण्यात आली. बीडसह अनेक भागांमध्ये आंदोलनेही झाली होती. अखेर अर्चना कुटेंना मंगळवारी अटक झाली. तयामुळे या प्रकरणातील कारवाईला वेग येईल असे ठेवीदारांना वाटते आहे.