छत्रपती संभाजीनगर : ट्रॅक्टर धुण्यासाठी घरालगत असलेल्या खड्ड्यातील खोल पाण्यात उतरलेले चार मुले गुरुवारी दुपारी बुडाली. गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील ही घटना आहे.

प्राप्त माहितीनुसार वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे रोडवरील लिंबेजळगाव शिवारातील गट क्रंमाक १७६ मधील शेत वस्तीवर शेख कुटुंब वास्तव्यास आहेत. कुटूंबातील इमरान इसाक शेख (वय २०) हा गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या टेंभापुरी धरणात वाहणाऱ्या खड्डयातील पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्या सोबत त्याच कुटुंबातील इम्मु इसाक पठाण (वय १०) जानु बाबू पठाण (वय १०) आणि घराशेजारचा मुलगा गौरव दत्तू तारक (वय १०) ही तीन लहान मुले होती. तिन्ही मुले लिबेंजळगाव जि.प.प्रशालेत शिकत असल्याची माहिती आहे.

मुलांचे आजोबा जाहेद पठाण हे आपल्या तीनही नातवांचा परिसरात शोध घेत होते. शोध घेत असतांनाच त्यांना जवळच पाण्याशेजारी टॅक्टर उभा असल्याचे दिसून आले. त्यांनी त्याकडे धाव घेत पाहणी करताच इतरांना माहिती दिली. तीन-चार दिवसापुर्वी वाळूज भागात झालेल्या मुसळधार पावसात नागझरीसह इतर नदी-नाल्यांना मोठा पुर आला होता. त्यामुळे आजही या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने मुले पाण्यात गेली असल्याचा अंदाज यावेळी उपस्थितांनी वर्तविला. घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे, पोलीस अंमलदार पांडुरंग शेळके, पोलीस अंमलदार स्वप्निल खाकरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. उपनिरीक्षक दशरथ खोसरे तपास करीत आहेत.