शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा एनडीएत यावं असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबारच्या सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, यावरून आता उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींवर खोचक शब्दात टीका केली आहे. आधी शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तरीही ते कधी मला, तर कधी शरद पवारांना डोळा मारत असतात, असे ते म्हणाले. संभाजीनगरमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“पंतप्रधान मोदी यांनी शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तरीही ते कधी मला, तर कधी शरद पवारांना डोळा मारत असतात. आज सकाळी त्यांनी पुन्हा शरद पवारांना डोळा मारला. आमच्याकडे या असं बोलले. एकीकडे आम्हाला नकली शिवेसना आणि राष्ट्रवादी म्हणतात आणि दुसरीकडे ‘आजा मेरी गाडी मे बैठ जा’ असंही म्हणतात, असं कसं चालेल? मुळात पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. त्यांना कळून चुकलंय की ते पुन्हा दिल्ली बघत नाहीत. महाराष्ट्र त्यांना दिल्ली बघू देणार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – पुण्यातील सभेत राज ठाकरेंकडून अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “या माणसाने कधीही…”…

“आता तुम्ही महागाईवर का बोलत नाहीत?”

पुढे बोलताना त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरूनही पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. “ज्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यावेळी मोदी महागाईच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका करत होते. मनमोहन सिंग महागाईचा ‘म’ बोलत नाही, असं ते म्हणायचे. मात्र, आता मोदी स्वत: पंतप्रधान आहेत. मात्र, ते आज गाईवर बोलतात, पण महागाईवर बोलत नाही”, असे ते म्हणाले.

“तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला आहे का?”

यावेळी बोलताना त्यांनी नकली पूत्र म्हटल्याच्या पंतप्रधान मोदींच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक, खासगी जीवनाबाबत बोललो नव्हतो, तसं बोलण्याची इच्छाही नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान होण्यासाठी माझी सही घेतली होती. गुरुवारी तुम्ही जे बोललात त्यासाठी तुम्हाला क्षमा करु शकत नाही. माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणालात. मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला आहे का? बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा खरंच विचार तुम्ही करा”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांनी एनडीएत येण्याच्या पंतप्रधान मोदींच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी भरकटले आहेत”

“नरेंद्र मोदी, तुम्ही माझा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं. माझी माणसं फोडली तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते? मग उद्धव ठाकरे बरा आहे की लोकांमधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भरकटले आहेत. आज एक अहवाल आला आहे त्यात सांगितलं आहे की मुस्लिमांची लोकसंख्या वाढली. त्यात आम्ही तुमचं कौतुक करायचं का? तुम्हाला मतं तरी कुणाची हवी आहेत?” असा प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरेंनी विचारला.