छत्रपती संभाजीनगर : चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यास पुन्हा पावसाने झोडपले. लातूर जिल्ह्यात नदीकिनारी उरलेसुरले पीकही वाहून गेले. या पावसामुळे काही भागात रब्बी पेरणीला पुन्हा उशीर होणार आहे. मराठवाड्यातील ४० महसूल मंडलांत अतिवृष्टी नोंदविण्यात आली. लातूर जिल्ह्यात १५० ते २०० हेक्टर शिवार पुन्हा पाण्याखाली गेले आहे. रेणापूर तालुक्यातील पळशी येथे सर्वाधिक १९५ मिमी पावसाची नोंद झाली.
मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत पावसाची ‘जोर’धार कायम होती.छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यात सर्वत्र हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस बुधवारी पडला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने रेणा प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले. भंडारवाडी, चुकारवाडी, कामखेडा, धनसरगाव या गावांसह अनेक गावांत पुन्हा पाणी शिरले. पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी रब्बी पेरणीला सुरुवात करण्यात आली होती. या शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, केज, धारुर या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. धारुर तालुक्यातील वाण नदीला पुन्हा एकदा पूर आला. काही ठिकाणी वेचणीला आलेला कापूस पुन्हा भिजला. अंबाजोगाई तालुक्यातील बरदापूर महसूल मंडलात ११८ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. धाराशिवमध्येही रात्रभर पाऊस सुरू होता. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातही अतिवृष्टी नोंदविण्यात आली. अनेक भागांतून उरलेसुरले पीकही वाहून गेले. या पावसामुळे रान दुरुस्त करून रब्बीची पेरणी करण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.
