छत्रपती संभाजीनगर : लातूर येथे शुक्रवारी रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. चाकूर, निलंगा आणि औसा तालुक्यात पावसाचा जोर वाढला. अनेक ग्रामीण रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. पुन्हा पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. ओसरु लागलेला पूर पुन्हा वाढला आहे. लातूर–बिदर–हैदराबाद महामार्गावरील वाहतूक बंद महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील विंचूर येथील पुलावरून पाणी आल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने कहर केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांना नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

लातूर येथे शुक्रवारी रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. चाकूर, निलंगा आणि औसा तालुक्यात पावसाचा जोर वाढला. अनेक ग्रामीण रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. पुन्हा पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. ओसरु लागलेला पूर पुन्हा वाढला आहे. चाकूर रेणापूर अहमदपूर आणि निलंगा तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.

बेंबळी -बोरखेडा रस्ता वाहतुकीस बंद झाला. काजळा तालुका धाराशिव पुलावरून पाणी वाढल्याने रस्ता वाहतुकीस बंद आहे. गोविंदपूर खामसवाडी रस्ता बंद झालेला आहे. धाराशिव तालुक्यातील आरणी गावात सकाळी आठच्या सुमारास नदीच्या प्रवाहातून मार्ग काढताना कुटुंबाने जीव धोक्यात घालणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश आले.

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात अवघ्या आठ तासांत ६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. तेरणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. निलंगा आणि औराद शहाजानी भगातील पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वांजरखेडा, ऊसतुरी, हालसी तुगाव, लिंबाळा,मानेजवळगा, बडूर,बोरसुरी या गावांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील औसा- भादा मार्गावरील हळदूुर्ग येथील पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली. त्याचबरोबर थोडगा येथील पुलावरून पाणी जात असल्याने थोडगा ते मोघा, किल्लारी ते मदनसुरी, उदगीर तालुक्यातील नेत्रगाव येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

अनेक गावे पुन्हा पुराने वेढली गेली आहेत. ज्या गावातून नागरिकांना सुरक्षित स्थळी आणले गेले होते त्या गावात नागरिकांना पुन्हा पाठवले गेले. त्यामुळे नव्याने पुन्हा बचाव कार्य करावे लागले असल्याची तक्रार धाराशिव जिल्ह्यातून केली जात आहे.