छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराजांना महाराणा प्रताप यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. त्यांच्या गनिमी काव्याच्या शैलीतही ते दिसते, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. डाव्या आणि मार्क्सवादी इतिहासकारांच्या दृष्टिकोनामुळे काही जण नाहकच औरंगजेबाविषयी सहानुभूती निर्माण करत आहेत असा आरोपही त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात केला.

शहरातील उद्यानात महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ज्या व्यक्ती औरंगजेबाबद्दल सहानुभूती निर्माण करत आहेत त्यांनी पंडित नेहरूंचे पुस्तक वाचले असते, तरी औरंगजेबाचे खरे रूप पुढे आले असते, असे ते यावेळी म्हणाले.

‘‘अकबराचे मांडलिकत्व न पत्करता स्वाभिमानाचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या महाराणा प्रताप यांनी समाज संघटित केला. महाराणा प्रताप यांनी कोणता त्रास सहन नाही केला? आता त्यांचा पुतळा धैर्य आणि वीरतेसाठी प्रेरणा देत राहील,’’ असे सिंह म्हणाले. स्वातंत्र्यानंतर इतिहासकारांनी गौरवशाली वीरतेचा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला अशी टीका केली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे भाषण झाले.