छत्रपती संभाजीनगर – लातूरमधील निलंगा तालुक्यातील काही गावांमध्ये २९ सप्टेंबरच्या रात्रीपासून ते ३० सप्टेंबरच्या पहाटेच्या सुमारापर्यंत तब्बल सातवेळा भूगर्भातून आवाज येऊ लागले. आवाजामुळे भूकंपाच्या भयाने नागरिक घर-दारं सोडून मोकळ्या जागी धावत एकत्र आले. मध्यरात्री तहसीलदारही सहकाऱ्यांसह दाखल झाले होते.

लातूर-धाराशिवला ३० सप्टेंबर १९९३ साली महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. किल्लारी-लोहारा परिसरात तर होत्याचं नव्हतं झाले होते. हजारो नागरिक मृत्यूमुखी पडले होते. या सर्व आठवणी कालच्या भूगर्भातील आवाजाने पुन्हा जाग्या झाल्या.

निलंगा तालुक्यातील कलांडी, डांगेवाडी, निटूर आदी गावांमधील भूगर्भातून २९ सप्टेंबर रोजी रात्री नऊपासून आवाज येण्यास सुरुवात झाली. ३० सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत सात वेळा आवाज आल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा आहे. तर या गावांना भेट देणाऱ्या तहसील प्रशासनाच्या मते भूगर्भातील आवाजाच्या संदर्भाने भूकंप मापन यंत्रणेकडे विचारणा केली असता तशी कुठलीही नोंद नाही. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडेही विचारले असता त्यांनीही काही नोंद झाली नसल्याचे सांगितले आहे. प्रशासन सर्व आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगून नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवेत फैरी झाडून स्मरण

महाप्रलंकारी भूकंपाला ३० सप्टेंबर रोजी ३२ वर्षे पूर्ण झाली. भूकंपातील मृतात्म्यांना वंदन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जुन्या किल्लारी गावठाणातील स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून व हवेत तीन फैरी झाडून वंदन करण्यात आले. या दिवसाची आठवण काळा दिवस म्हणून बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.