छत्रपती संभाजीनगर : अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे आणि वातावरणात आर्द्रता-दमटपणा निर्माण झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. सुमारे १५ ते २० हजार चाळींमधील दर वाढतील म्हणून साठवून ठेवलेला कांदाही सडला, काळवंडला असून, कांदा रोपांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून रोपांची साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी, जून ते जुलै व नोव्हेंबर या तीन हंगामात पुनर्लागवडीसाठी शेती केली जाते. वैजापूर तालुक्यातील दीड हजार हेक्टवरील कांद्याच्या रोपांची शेती धोक्यात आली आहे. गारज, शिऊर, लासूर या भागातील काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. वैजापूर तालुक्यात एकूण २० हजार हेक्टरवर कांद्याचे क्षेत्र असल्याची माहिती कृषी मंडळ अधिकारी विशाल साळवे यांनी दिली. वैजापूर तालुक्यात सहा ते सात हजारांवर अनुदानित कांदा चाळींची संख्या असून, विनाअनुदानित चाळींचीही संख्या चार ते पाच हजारांच्या आसपास असल्याची माहिती आहे.
साधारणपणे वैजापूर एवढीच गंगापूर, कन्नड व पैठणमधील कांद्याच्या रोपांच्या शेतीचे नुकसान झाले असून, कांदा चाळीतील कांद्याचेही पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. पैठण तालुक्यातील विहामांडवा गटातील ४० ते ५० हेक्टरवरील कांद्याचे दोन दिवसांपूर्वीच्या ढगफुटीसदृश पावसाने नुकसान झाले. लागवड ते विक्री पर्यंतच्या टप्पा पाहिला तर एकरी ९२ हजार खर्च येत असून, कांद्याची शेती परवडत नसल्याचे रामनगर येथील तरुण उच्च शिक्षित शेतकरी गणेश खेडकर यांनी सांगितले.
वैजापूर, गंगापूरमधील ७० टक्के कांद्याचे पावसाने नुकसान झाले आहे. चाळीतील कांदाही सडला असून, रोपांच्या शेतीचेही नुकसान झाले आहे. – सीताराम वैद्य, सदस्य, कांदा फेडरेशन
पैठण तालुक्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने ७० हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात काही ठिकाणच्या कांद्याचाही समावेश आहे. वैजापूरमध्ये सहा हजारांवर अनुदानित कांदा चाळी आहेत. गंगापूर, कन्नडमध्येही कांदा चाळी आहेत. – डाॅ. प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक.