परभणी : झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण व रत्नमाला चव्हाण यांनी पाल्याचा टीसी मागितल्यावरून केलेल्या मारहाणीत पालक हभप जगन्नाथ हेंडगे महाराज यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत पालकाला तत्काळ न्याय मिळावा यासाठी उखळद व पंचक्रोशितील नागरिकांनी व वारकरी मंडळींनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून मृत पालकाला तत्काळ न्याय देण्याची मागणी केली.
मागील गुरुवारी मृत पालक हभप जगन्नाथ हेंडगे हे आपल्या तिसरीत शिकत असलेल्या पल्लवी या मुलीचा टीसी काढण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत गेले असता टीसी देण्याच्या कारणावरून संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण व रत्नमाला चव्हाण या पती-पत्नीने अमानुष मारहाण केली. पालक जगन्नाथ हेंडगे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या संदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी उखळद येथे पंचक्रोशितील गावकऱ्यांची रविवारी बैठक झाली.
त्यानंतर मंगळवारी सकाळी वसमत रस्त्यावरील कृष्ण गार्डन परिसरातून मोर्चा निघाला. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चेकरी धडकले. येथे आंदोलनाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी अनेकांनी भावना व्यक्त करत मयत हभप जगन्नाथ हेंडगे यांच्या न्यायाची मागणी केली. तसेच या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांना देण्यात आले. यावेळी फरार संस्थाचालक आरोपी प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण व रत्नमाला चव्हाण यांना तत्काळ अटक करावी, संस्थाचालकाच्या सर्व संस्थांवर तत्काळ कारवाई करून त्या बंद कराव्यात, पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांचे तत्काळ निलंबन करावे, मृताच्या कुटुंबास पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक मदत द्यावी, मयताच्या भावास शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मयत हभप जगन्नाथ हेंडगे महाराज यांच्या मुली पल्लवी व सृष्टी, हभप अच्युत महाराज दस्तापूरकर, प्रेरणा वरपुडकर, आनंद भरोसे, सुभाष जावळे, दीपक केदार, गंगाप्रसाद आनेराव, नागसेन भेरजे, गणेश हेंडगे, भास्करराव हेंडगे, उत्तमराव हेंडगे, मोतीराम हेंडगे, गंगाधर हेंडगे, ज्ञानेश्वर जोगदंड आदींची उपस्थिती होती. या आंदोलनात उखळद व पंचक्रोशितील महिला, पुरूष तसेच जिल्हाभरातील शिक्षणप्रेमी, पालक आणि नागरिकांची उपस्थिती होती.
संस्थाचालकाची माहिती देणाऱ्यास बक्षीस
हिंगोली-वसमत तालुक्यातील तुळजापूरवाडी येथील मूळ रहिवासी असलेला संस्थाचालक प्रभाकर व त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्या शोधासाठी परभणीचे पोलीस दोन दिवसांपासून तळ ठाेकून असून, आरोपींची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देणार असल्याचे एक पत्रक काढण्यात आले. परभणी पोलिसांनी काढलेल्या या पत्रकावर ‘वाँटेड’ असे नमूद असून या प्रकरणी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे, तसेच आरोपींची छायाचित्रेही प्रकाशित करण्यात आली आहेत.