छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे ज्येष्ठ प्रचारक माधव विनायक कुलकर्णी उपाख्य मधुभाई (वय ८८) यांचे वार्धक्यामुळे गुरुवारी दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्यांनी देहदान केले असून, तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संघाच्या येथील ‘समर्पण’ या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भैय्याजी जोशी, बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे हे दाखल झाले असून, सायंकाळपर्यंत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेही येत असल्याचे ज्येष्ठ स्वयंसेवकांकडून सांगण्यात आले.

दोन आठवड्यांपूर्वीच सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी डाॅ. हेडगेवार रुग्णालयात जाऊन मधुभाईंची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मधुभाईंना गुजरातमध्ये प्रांतप्रचारक म्हणून १९८५ मध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी संघ प्रचारक असलेले नरेंद्र मोदींना भाजपमध्ये पाठवले होते. पुढे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले व नंतर पंतप्रधान.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी प्रसिध्द झालेल्या काही लेखांमध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी दिला मोदींना राजकारणात जाण्याचा आदेश या लेखामध्ये मधूभाईंचा उल्लेख करण्यात आला होता. मधूभाई हे साठच्या दशकात छत्रपती संभाजीनगर येथे संघाचे प्रचारक म्हणून आले. त्यानंतर त्यांना गुजरातेत पाठविण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे १७ मे १९३८ रोजी जन्मलेल्या मधुभाई यांनी विभाग, प्रांत, क्षेत्रीय प्रचारक अशा जबाबदा-या संघात सांभाळल्या. गेल्या काही वर्षांपासून वृद्धापकाळाने त्यांचे वास्तव्य छत्रपती संभाजीनगरात होते. त्यांनी देहदान केले असून, त्यांचे पार्थिव रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आर. के. दमाणी वैद्यकीय महाविद्यालयास सायंकाळी नेण्यात येणार आहे.