|| बिपीन देशपांडे

 

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) २०१९ या वर्षांत प्रसूत झालेल्या महिलांची संख्या आहे १९ हजार ३२२. ही संख्या एवढी वाढली कशी, याचे उत्तर शोधले तेव्हा ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या असुविधांचे कारण आवर्जून सांगण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील महिला थेट औरंगाबाद गाठतात आणि शेवटच्या क्षणी जे रुग्णालय अतिजोखमींच्या रुग्णांसाठी आहे तेथे प्रसूतींची संख्या वाढते. परिणामी या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढतो.

विभागात २१० खाटा असून दाखल होणाऱ्या महिलांची संख्या २५० पेक्षा अधिक आहे. यासाठी १२ जणांच्या डॉक्टरांचा चमू काम करतो. ग्रामीण भागातील नागरिक हे घरातील महिलांची प्रसूती करण्यासाठी थेट शहरात धाव घेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ातील बहुतांश प्राथमिक केंद्रात प्रसूतीची सुविधा आहे. एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रांत ४ हजार १९२ महिला प्रसूत झाल्या आहेत. त्यातही लासूर (२४६), आमठाणा (४५०), करंजखेडा (३१२) अशा काही दहा ते १२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतींची आकडेवारी उल्लेखनीय आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी सांगितले. मात्र, बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होत नाहीत. काही ठिकाणी आरोग्य केंद्राची इमारतही नाही. काही ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येते.

औरंगाबादची घाटी हे मराठवाडय़ातील आठ व बुलढाण्यासारख्या पश्चिम विदर्भाच्या सीमेवरील जिल्हा व अहमदनगरच्या काही तालुक्यांतील रुग्णांना उपचारासाठी सोयीचे शासकीय रुग्णालय आहे. याशिवाय एखाद्या अवघड प्रसूतीच्या प्रकरणात धुळे किंवा अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातूनही महिलांना घाटीतच पाठवले जात आहे. त्यामुळे घाटीत दाखल होणाऱ्या महिलांचा आकडा वाढताच आहे. २०१२ सालापासूनची घाटीतील प्रसूती विभागात दाखल होणाऱ्या महिलांची संख्या पाहता हा आकडा दरवर्षीच वाढत गेलेला आहे. त्याला ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील असुविधांचेही एक कारण असल्याचे सांगितले जाते.

घाटीतील प्रसूती विभागाकडे आवश्यक सोयी-सुविधा नसतानाही नैसर्गिक प्रसूती झालेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा केला जातो आहे. २०१९ मध्ये घाटीतील प्रसूती विभागात १९ हजार ३२२ महिलांना दाखल करण्यात आले. त्यांची प्रसूती याच विभागात झाली. त्यातील ७३ टक्के महिलांची प्रसूती ही नैसर्गिकरीत्या झालेली आहे. तर पाच हजार १२० महिलांची प्रसूती ही शस्त्रक्रियेद्वारे झाली. त्याची टक्केवारी २६ एवढी आहे. येथे दाखल झालेल्या बहुतांश महिला या ग्रामीण भागातील आहेत. काही धुळे, अंबाजोगाई, बुलढाणा व अहमदनगर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील असल्याची माहिती घाटीतील प्रसूती विभागातील सूत्रांकडून मिळाली.

माता मृत्यू २६ टक्के

२०१९ या वर्षांत प्रसूतीसाठी घाटीत दाखल झालेल्या ७५ महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ७४ महिला या बाहेरील रुग्णालयातून येथे दाखल झालेल्या होत्या. एका महिलेचा मृत्यू हे घाटीतील रुग्णालयात दाखल झालेला आहे. ६४८ अर्भकांचा मृत्यू हा जन्मतच झालेला आहे. माता मृत्यू होण्याच्या कारणांमध्ये प्रसूतीदरम्यान रक्तस्राव, रक्तदाब, कावीळ, पूर्वीच्या गर्भपातातील संसर्ग आदी कारणे असल्याचे प्रसूती विभाग प्रमुख डॉ. एस. एन. गडाप्पा यांनी सांगितले.

अशी वाढत गेली आकडेवारी

सरलेल्या वर्षांत- २०१९ मध्ये १९ हजार ३२२, २०१८-१८,४६१, २०१७- १७,९३७, २०१६- १५,६८५, २०१५-१६,७४८, २०१४-  १५,८०७, २०१३- १५,०३४ तर २०१२ मध्ये १२ हजार ३३० महिलांची प्रसूती झाली. यातील प्रत्येक वर्षांत नैसर्गिक प्रसूतीच्या आकडेवारीत वाढच झालेली आहे, असे डॉ. गडाप्पा यांनी सांगितले.