शिंदे सरकारविरोधात महाविकास अघाडीकडून संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिली सभा येत्या २ एप्रिलरोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडेल. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सभेवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय शिरसाट?
“महाविकास आघाडीने सभा घ्यावी. त्यांना जर सभा घेण्यासाठी बंदी घातली, लोकशाहीचा गळा घोटल्या जात आहे, असा आरोप ते करतील. मुळात त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. त्यांच्या सभेत दोन-चार टोमणे आणि डायलॉग असतील. एकमेकांना डोळे मारतील. या सभेत शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या हितांच काहीही बोलणार नाहीत. महाविकास आघाडीची सभा म्हणजे केवळ कॉमेडी शो आहे”, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.
“संजय राऊत हा मुर्ख माणूस”
पुढे बोलताना त्यांनी संजय राऊतांनाही लक्ष्य केलं. “सगळ्या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यासंदर्भात बोलताना “संजय राऊत हा मुर्ख माणूस आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – मुंबईतल्या मालाडमध्ये राम नवमी शोभायात्रेवेळी गोंधळ, तीन गटांमध्ये राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज
“संभाजीनगरमधील राडा पूर्वनियोजित”
दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरही त्यांनी भाष्य केलं. “कोणत्याही शहरातील वातावरण बिघडू नये, या मताचा मी आहे. पण काल संभाजीनगरमध्येजी दंगल झाली. ती दंगल पूर्वनियोजित होती, असं दिसतंय. त्याशिवाय अर्धा तासात पोलिसांच्या १३ गाड्या जाळणं, हे शक्य नाही. संभाजीनगर शहरात अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. त्याचा बंदोबस्त आता झाला पाहिजे. यासंदर्भात मी पोलीस आयुक्ताशी चर्चा करेन”, असेही ते म्हणाले.