छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात थैमान घातलेल्या पावसात बीडजवळील आर्वी येथील शांतिवन प्रकल्पाची जमीन खरडून पिकांचे नुकसान झाले. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न मोडून काढले आणि शांतिवनच्या शेतीचंही प्रचंड नुकसान झाले आहे.

शांतिवनचे संचालक दीपक नागरगोजे यांनी सांगितले की, कापसाचे १० एकरवरील पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. सिंदफणा नदीने उग्र रूप धारण केल्याने आणि नदीकाठावरील संपूर्ण शेती पंधरा फूट पाण्याखाली गेली. जिथे शेत दिसायचं त्या परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. जे पीक भरघोस येत होतं ते सगळं होत्याचं नव्हतं झाले आहे. केवळ पिकाचंच नाही तर जमिनीचंही मोठं नुकसान झाले आहे. यावर्षी भरघोस पिकेल हे स्वप्न पुराच्या पाण्यात वाहून गेले. लेकरांच्या तोंडातला घास निसर्गाने काढून घेतला.

नदीकाठची शेती इतकी धोक्यात आली की, अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाडं पडली आहेत. जमिनीचे तुकडे नदीत वाहून गेले. शेती करण्यायोग्य सुपीक मातीच पूर्णपणे नष्ट झाली आहे. आता ही शेती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अनेक वर्ष लागतील. या संकटातून बाहेर पडण्यासाठी समाज, प्रशासन आणि शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले.