कर्जमाफीचा आलेख उतरताच
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून मराठवाडय़ातील ११ लाख ७६ हजार ८९८ शेतकऱ्यांना पाच हजार ३२५ कोटी रुपये १६ लाख ७९ हजार रुपयांची कर्जमाफी झाली. नव्याने महाआघाडी सरकारने कर्जमाफी योजनेचे नाव महात्मा फुले कर्जमुक्ती योजना केल्यानंतर मराठवाडय़ातील जिल्हा बँकांमधील पाच लाख ५९ हजार ८५२ शेतकऱ्यांपैकी तीन लाख ९३ हजार २८३ शेतकऱ्यांना केवळ १२२१ कोटी ३६ लाख ९८ हजार रुपयांची कर्जमाफी होऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमधील आकडेवारी अद्यापि उपलब्ध नसली तरी पीक कर्ज लक्षात घेता ती फारशी अधिक असणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
सत्ता आल्यानंतर कर्जमुक्ती केली जाईल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा सांगत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जाहीर केलेल्या कर्जमुक्तीच्या शासन निर्णयानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी टाकण्यात आलेल्या अटी-शर्तीचा विचार करता ही कर्जमाफी मर्यादित राहील, असे सांगण्यात येत आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ सप्टेंबर २०१९ या कालावधीतील अल्पमुदतीचे व अल्पमुदतीच्या कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाईल, असे आदेश होते. ज्या शेतकऱ्यांचे पुनर्गठित कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना ही रक्कम मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे येणार असून त्या निमित्ताने शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी म्हणून जिल्हा बँकांचे कर्ज आणि त्यातून मिळणारा कर्जलाभ याचा अंदाज घेण्यात आला. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पाच लाख ५९ हजार ८५२ शेतकऱ्यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप करण्यात आले. ही रक्कम दोन हजार ५६६ कोटी चार लाख ६५ हजार एवढी आहे. त्यापैकी केवळ तीन लाख ९३ हजार २८३ शेतकऱ्यांना १२२१ कोटी ३६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकेल. पण ही कर्जमाफी करण्यासाठी आधारकार्डशी बँक खाते जोडलेले असणे अनिवार्य आहे.
मराठवाडय़ातील एक लाख ७५ हजार ७८७ शेतकऱ्यांचे कर्ज खाते बँकांशी जोडण्यात आलेले नाही. त्यामुळे आता गावपातळीवर दवंडी द्या आणि आधारकार्डाशी खाते जोडून घ्या, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे.
- भाजप-शिवसेना युतीच्या काळातील कर्जमाफी- ११ लाख ७६ हजार ८९८ शेतकऱ्यांना ५३२५ कोटी १६ लाख
- महाविकास आघाडीचा कर्जमाफीचा संभाव्य आकडा (जिल्हा बँक मर्यादित)- १२२१ कोटी ३६ लाख
कर्जमाफीचे श्रेय घेण्यासाठी सर्व पक्ष पुढाकार घेतात. मात्र, जेव्हा पीककर्ज द्यायचे असते तेव्हा सर्व बँका हात आखडता ठेवतात. गरज म्हणून मग शेतकरी सावकाराच्या दारात उभा ठाकतो. मुळात शेतकऱ्याला मदत होते का, असा प्रश्न आहेच. मुळात कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकांना अधिक होतो. त्यांचे थकीत कर्जाचे आकडे कमी होतात. जेव्हा नड असते तेव्हा शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, अशी नवी प्रणाली विकसित होण्याची गरज आहे. -देवीदास तुळजापूरकर (एआयईबीए, बँकर्स संघटना)