औरंगाबाद : घोषणांची अतिवृष्टी करणारे हे सरकार भावनाशून्य आणि उत्सवी आहे, असा टोला लगावत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे (एनडीआरएफ) निकषात तातडीने बदल करण्याची मागणी रविवारी पत्रकार बैठकीत केली. आमच्याशी गद्दारी केली हे ठीक, पण किमान अन्नदात्याशी तरी गद्दारी करू नका, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या गावात अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणी केली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. निकष बदलाची ही मागणी कोविडकाळात पंतप्रधान त्यांच्या घरी आणि मी माझ्या घरी असताना केली होती, असा तिरकस टोलाही त्यांनी भाजपला लगावला. कोविडकाळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी घरात बसूनच कारभार केल्याच्या टीका होते. त्या टीकेला हा टोला प्रतिउत्तर मानले जाते.
तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गंगापूर, वैजापूरसह पिकांचे नुकसान वाढत गेले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी काही कुटुंबांना आवर्जून मदत केली होती. गंगापूर तालुक्यातील हृषीकेश चव्हाण नावाचा छोटा मुलगा वडिलांकडे पैसे नसल्याने कपडय़ाचा हट्ट करत नसल्याचे भावनिक वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शिवसेना नेत्यांनी त्याला मदत केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही या कुटुंबाशी दूरध्वनीवरून बोलले. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात त्यांचा दौरा ठरविण्यात आला.
रविवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यातील दहेगाव येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पाहणी केली. या वेळी किसनराव धोंडे यांनी अतिवृष्टीमुळे मका पिकात कोंब आल्याचे सांगितले. सरपंच विक्रम राऊत यांच्यासह शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे मदत न मिळाल्याची तक्रार तर केलीच शिवाय दिवाळीसाठी म्हणून जाहीर केलेले राज्य सरकारचा ‘आनंदाचा शिधा’ही पोहोचला नसल्याचे आवर्जून सांगितले.
या पाहणीनंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाची मागणी करणाऱ्यांना राज्य सरकारकडून कसे बोल ऐकविले जात आहेत, हे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते तिरकसपणे म्हणाले, आपल्या उपमुख्यमंत्र्यांकडे सगळय़ा प्रश्नांची उत्तरे असतात. पुण्यात खूप पाऊस पडल्यानंतर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले होते, पाऊस काही महापालिकेला विचारून पडत नाही. आता ते म्हणतील, शेतात पाऊस काही सरकारला विचारून पडत नाही; पण करोनाकाळात ज्या शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था टिकवून धरली ते आता अडचणी आहेत. पण हे उत्सवी सरकार आहे. उत्सव करण्यास माझा विरोध नाही; पण जनता समाधानी आहे की नाही हे तरी पाहा. सुखी आहे की नाही पाहा, असेही हे म्हणत नाही. पण हे सरकार बेदरकारपणे वागत आहे. त्यामुळे हे अपयशी सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
घर सोडून गरगर फिरणाऱ्यांवर मला फार बोलायचे नाही; पण ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली ते ठीक; पण किमान अन्नदात्याशी तरी गद्दारी करू नका, असेही ते म्हणाले. ठाकरे यांच्या दौऱ्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार विनायक राऊत, अरिवद सावंत, मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनीच आसूड घ्यावा..
ज्या गावात शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली त्या वेळी त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी केली. शिवसेना या मागणीच्या पाठीशी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आता काय दिसले म्हणजे ओला दुष्काळ जाहीर होईल, हे माहीत नाही; पण सरकारला पाझर फुटत नसेल तर आसूड घेऊन शेतकऱ्यांनीच त्यांना घाम फोडावा, असेही ते म्हणाले.