डास रक्त हे खाद्य म्हणून वापरत असतो. त्याने ‘अ’ प्रकारचे रक्तपेशी असलेले रक्त शोषून घेतले तर त्याच्या शरीरात (तोंडात इ) प्रति ‘अ’ नसल्यामुळे गुठळी तयार होण्याचा प्रश्नच येत नाही.
कंपासपेटीत असणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोडरबर. माझा खोडरबर मस्त आहे. छान खोडलं जातं त्यानं, असं म्हणत तुम्ही मित्र एकमेकांना आपला खोडरबर दाखवत असता. लिहिताना चुकलं की पटकन खोडरबरच कामाला येतो. चुकलेलं खोडायचं आणि परत लिहायचं असं बऱ्याचदा करावं लागतं. कागदावर पेन्सिलने किंवा पेनने लिहिलेले पुसून टाकण्यासाठी रबराचा उपयोग होतो म्हणून त्याला खोडरबर किंवा इरेझर असे नाव मिळाले. पेन्सिलने लिहिताना कागदावर काळे शिसे चिकटते. हे शिसे ग्रॅफाइट आणि मऊ माती यापासून बनवतात. ग्रॅफाइट हे कोळशाच्या विविध रूपांपैकी एक आहे. रबराने खोडताना आपण थोडासा जोर लावतो. तेव्हा विषम आकर्षणाने कागदावरचे ग्रॅफाइट रबराला लागते आणि कागद स्वच्छ होतो. पेनाने लिहिलेले खोडायला थोडे वेगळे रबर वापरावे लागते. पण शाईचे खोडताना कागदही थोडा पातळ होतो.
लिहिताना मध्येच खोडायचे म्हटले की, खोडरबराची शोधाशोध सुरू होते. तसे होऊ नये म्हणून हायमन लिपमन या कल्पक माणसाने पेन्सिलच्या दुसऱ्या टोकाला रबर जोडलेल्या पेन्सिली तयार केल्या. हल्ली रंगीत तसेच वासाचे खोडरबर मिळतात. विविध आकाराची त्यावर चित्रे छापलेली रबरे छान दिसतात; परंतु खोडण्याचे काम चांगले करण्यासाठी पांढरे मऊ खोडरबरच जास्त उपयोगी ठरतात.
आगगाडीचा शोध
आज जगातील बहुतेक देशांमध्ये आगगाडी- ट्रेन चालतात. ट्रेनने फक्त प्रवासी वाहतूकच होते असं नाही, तर वेगवेगळ्या वस्तूंची ने-आणदेखील होते. अशा या ट्रेन ऊर्फ आगगाडीचा शोध केव्हा लागला हे माहीत आहे?
मनुष्याला पाण्याच्या वाफेत असलेल्या शक्तीची ओळख झाली. अलेक्झांड्रिया येथील हिरो यांनी सर्वप्रथम वाफेवर चालणारं टर्बाइन बनविलं. १७०५ साली इंग्लंडच्या थॉमस न्यूकॉमेन यांनी वाफेवर चालणारं इंजिन बनविलं.
१८०३ साली रॉबर्ट फुल्टन यांनी इंजिनच्या सहाय्याने बोट चालविली. १८२० साली इंग्लंडच्या जॉर्ज स्टिफन्सन यांनी वाफेचे इंजिन तयार केले. जॉर्ज स्टिफन्सन यांनी स्वत: हे इंजिन चालविले व त्यांच्यासोबत काही लोकांना सहलीसाठी घेतले.
पहिली प्रवासी गाडी व मालगाडी १८२५ मध्ये सुरू झाली. १९३८ पर्यंत ट्रेनच्या इंजिनमध्ये खूप सुधारणा झाल्या. १८९३ साली विजेवर चालणारे इंजिन तयार झाले. १९१२ साली डिझेलवर चालणारं इंजिन तयार झाल्यानंतर वाफेवर चालणाऱ्या इंजिनचं महत्त्व बरंच कमी झालं.
सध्या जगातील सर्वात वेगाने जाणारी ट्रेन जपान या देशामध्ये धावते. भारतामध्ये आगगाडीची सुरुवात १८५३ साली मुंबई ते ठाणे या मार्गावर झाली.