मृत्यूचा सोहळा : फनरल

विवेक दुबे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

funral, movie,
विवेक दुबे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

जगभरात सर्वत्रच, मृत्यू आणि मृत्यूशी संबंधित सर्व गोष्टी नकारात्मक आणि अशुभ मानल्या जातात. खरंतर, जीवनात मृत्यू ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव कधी ना कधी मरणार आहेच. तरीही मरण हे काहीतरी अघटित असल्याची आपली भावना असते, म्हणूनच जन्माचा उत्सव साजरा केला जातो आणि मृत्यूबद्दल शोक पाळला जातो. “काळ आम्हांसी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ” अशी भूमिका केवळ जीवनाचं तत्वज्ञान कोळून प्यायलेले तुकाराम महाराजां सारखे सिद्धपुरुषच घेऊ शकतात.

आणखी वाचा : करीना कपूरला राहुल गांधी यांच्यासोबत जायचे होते डेटला?, अभिनेत्रीने केला होता खुलासा

जन्म ही एका प्रवासाची सुरुवात असली तर मृत्यू ही त्या प्रवासाची इतिपुर्ती आहे. त्यामुळे मृत्यू ही जन्माइतकीच; किंबहुना, जन्माहून अधिक आनंदाने साजरी करावयाची घटना आहे. ‘जगू आनंदे निघू आनंदे’ अशी टॅगलाईन असलेल्या, रमेश दिघे लिखित आणि विवेक दुबे दिग्दर्शित ‘फनरल’ या सिनेमात हाच संदेश हलक्या-फुलक्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आणखी वाचा : “बाप कुणाला कळतो गं…”, मंजिरी ओकने Father’s Day निमित्ताने पती प्रसादसाठी शेअर केली ‘ही’ खास पोस्ट

चाळीत राहणारे चार निम्न मध्यमवर्गीय बेरोजगार तरुण मित्र. घरच्यांनी ओवाळून टाकलेले, नोकरी किंवा कामधंदा मिळविण्यासाठी त्यांची चाललेली धडपड आणि वेगवेगळ्या कारणांनी त्यात येणारे अपयश. एका तरुणीला तिच्या वडिलांच्या अंतिमसंस्कारासाठी केलेली मदत आणि त्या मदतीतून पुढे आलेली सन्मानजनक अंत्यसंस्काराचा व्यवसाय करण्याची आयडिया. ही नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणताना मित्रा-मित्रांत झालेले मतभेद, कुटुंब तसेच समाजाकडून आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात. अशी अगदी सरळ रेषेत जाणारी, प्रेडिक्टेबल स्टोरीलाईन असली तिची हलकीफुलकी हाताळणी आणि सर्वच कलाकारांची सहज अदाकारी यामुळे हा सिनेमा बघण्यायोग्य झालेला आहे. सिनेमातील एकमेव गाणं आणि सिनेमाचं पार्श्वसंगीत विषयवस्तूला पूरक असून इतर तांत्रिक अंगेही उत्तम जमून आली आहेत.

आणखी वाचा : ब्रह्मास्त्र: रणबीर कपूरने मंदिरात बूट का घातले? दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिले स्पष्टीकरण

हिरा (आरोह वेलणकर) सूर्या (हर्षद शिंदे), विनोद (पार्थ घाटगे), सदा (सिद्धेश पुजारे), हिराचा आजोबा (विजय केंकरे), मोरे आजी (प्रेमा साखरदांडे) आणि हिराची मैत्रीण मीनल (तन्वी बर्वे) ही सर्व पात्रे लिखाणात उत्तम उतरली आहेत आणि सर्व कलाकारांनीही आपापल्या पात्राला योग्य न्याय दिलेला आहे. सहज वावर आणि नेमक्या भावना दाखविणारा बोलका चेहरा यामुळे आरोह वेलणकरकडून भविष्यात अधिक उत्तम भूमिकांची अपेक्षा करता येईल. मार्टिन नावाच्या कावळ्याच्या प्रतीकातून दिलेला अप्रत्यक्ष संदेश आणि मुडदाघरातील कर्मचारी कचरू (संभाजी भगत) यांच्या तोंडून वदविलेले जीवनाचे तत्वज्ञान जेव्हढ्यास तेव्हढे असल्याने त्याचा ओव्हरडोस होत नाही.

आणखी वाचा : Don 3 साठी बिग बी आणि किंग खान येणार एकत्र? अमिताभ यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

सुरुवातीला विषयाची पार्श्वभूमी तयार करण्यात आणि कॅरेक्टरायझेशन करण्यात सिनेमा काहीसा रेंगाळला असला तरी तो विषयाचा धागा सुटू देत नाही. आनंदाने जगलो तर मृत्यूचाही उत्सव करता येतो हा गंभीर सामाजिक संदेश हसतखेळत देणारा ‘फनरल’ हा सिनेमा एकदा जरूर पाहण्याजोगा आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Funral movie review director vivek dubey aaroh velankar sidhesh pujare dcp

फोटो गॅलरी