आशीष वेले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनतेची भूक भागवून अन्नधान्याच्या बाबतीत जगावरचे परावलंबित्व संपवून भारताला अन्नधान्य उत्पादनात समृद्ध करण्यात आणि जगातील सर्वात मोठी कृषी अर्थव्यवस्था म्हणून भारताला नावारूपाला आणण्यात डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले. म्हणूनच त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. स्वामीनाथन यांच्या निधनाने जागतिक कृषी क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे.

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ मध्ये झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून कृषी अनुवांशिक आणि वनस्पती प्रजनन शास्त्रात पीएच. डी. केली. डॉ. स्वामीनाथन यांनी देशाला अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण करून अन्नधान्याच्या बाबत समृद्ध केले. गहू आणि तांदळाच्या संकरीत, जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा शोध लावला. परिणामी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. देशाच्या कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला. त्यांनी संशोधित केलेली वाण कीड, कीटक आणि रोगांनाही अधिक प्रतिरोधक होती. परिणामी पिकांचे कीड, रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टळले आणि उत्पादनात मोठी वाढ झाली. अन्नधान्य उत्पादनामुळे देशाचे अन्नसुरक्षा अधिक मजबूत झाली.

हेही वाचा… MS Swaminathan Passes Away: ‘हरित क्रांतीचे जनक’ एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन

स्वामीनाथन यांच्या कार्याचा भारतातीलच नव्हे तर जगभरातील कृषी क्षेत्रावर दूरगामी सकारात्मक प्रभाव पडला. हरित क्रांतीचा संदेश इतर गरीब, विकसनशील देशांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आणि अनेक गरीब देशांचे अन्नधान्य उत्पादन वाढवून, भूकमुक्त करून लाखो लोकांचा जीव वाचवून राहणीमान सुधारण्यास मदत केली.

स्वामीनाथन यांनी बदलत्या पर्यावरणाचा विचार करून कायमच शाश्वत शेतीचेही जोरदार समर्थन केले. शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे, हानिकारक रसायनांचा वापर कमी करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यावर त्यांनी भर दिला आहे. हा दृष्टीकोन केवळ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन सुधारण्यास मदत करत नाही तर भविष्यातील पिढ्यांना सुपीक जमीन आणि शुद्ध पाणी उपलब्ध होईल याची खात्री देतो. स्वामीनाथन यांना त्यांच्या कार्यासाठी जपान सरकारकडून जागतिक अन्न पुरस्कार, पद्मविभूषण आणि ऑर्डर ऑफ द सेक्रेड ट्रेझरसह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

ते अखेरच्या श्वासापर्यंत संशोधक म्हणून काम करत राहिले. शाश्वत शेतीचे समर्थन करत राहिले.

अन्नसुरक्षा विधेयकात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ७ ऑगस्ट २०२३ रोजी प्रा. स्वामीनाथन यांनी ९९ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, स्वामीनाथन फाउंडेशनने (MSSRF) चेन्नई येथे पौष्टिक तृणधान्य बाजरीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. वयाच्या ९९ व्या वर्षीही स्वामीनाथन यांनी पौष्टिक तृणधान्याचा प्रचार प्रसिद्धीसाठी मोलाचा वाटा स्वीकारला.

२०व्या शतकातील जगातील सर्वात महत्त्वाच्या कृषी शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे संशोधन शेतकर्‍यांच्या नवीन पिढ्यांना प्रेरणा देत आहे. प्रत्येकाला पोषक आणि परवडणारे अन्न उपलब्ध करून देणारे खरे लोकनायक, शेती आणि शेतकऱ्यांचा उद्धार करणारा खरा भूमिपुत्र म्हणून डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांची आठवण कायम राहील.

दुर्दैवाने स्वामीनाथन अहवाल स्वीकारायला देशातील कोणत्याही राजकीय पक्षांनी तयारी दाखवली नाही, ही या देशातील शेतकरी समुदायाबाबतची शोकांतिका आहे.

(लेखक कृषी सल्लागार आहेत)

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revolutionaries in indian agricultural asj