भाजपचा उमेदवार ठरविण्यासाठी शुक्रवारी बैठक; मुख्यमंत्री लवकरच शहांच्या भेटीला

निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी ‘सामना’ केल्यावर आता सरकार व अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालविण्यासाठी भाजपचा योग्य सन्मान राखला जाईल, या पद्धतीने कसा ‘समेट’ करायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आहे. सामंजस्य निर्माण करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आला, हे दाखविण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न असून शुक्रवारी शिवसेनेला प्रस्ताव पाठविला जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून तो धुडकावून लावण्याचेच संकेत असून महापौरपदाचा भाजपचा उमेदवार ठरविण्यासाठी सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी रात्री होणार आहे. शिवसेनेशी संघर्ष अटळ असल्याने रणनीती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस लवकरच अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढविण्यात आल्यावर शिवसेनेशी सन्मानजनक तोडगा काढणे अवघड झाले आहे. महापौरपद व स्थायी समिती अध्यक्षपद देण्यास शिवसेना अजिबात तयार नाही. तर भाजपने शिवसेनला जोरदार लढत देत ८२ जागा मिळविल्यावर केवळ उपमहापौरपद व अन्य काही समित्या घेऊन तडजोड केल्यास भाजपने सरकार टिकविण्यासाठी नमती भूमिका घेतली, असे चित्र निर्माण होईल. याआधी भाजपकडे शिवसेनेच्या निम्म्याहून कमी जागा होत्या. त्यामुळे आता भाजपचे संख्याबळ शिवसेनेच्या बरोबरीने असल्याने भाजपला सत्तेतील वाटा बरोबरीचाच व सन्मानजनकच असला पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक पावले उचलण्याआधी सरकार टिकविण्यासाठी सबुरीचा सल्ला देत भूमिका ठरविण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहेत. पण शिवसेनेशी संघर्ष सुरू करण्यापूर्वी काही मुद्दय़ांवर निवडणुकीआधी शहा यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस हे चर्चाही करणार आहेत.

सबुरीचा सल्ला

भाजपचा महापौरपदाचा उमेदवार ठरविण्याआधी शिवसेनशी समझोता करण्याचा प्रयत्न केला, हे दाखविण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची राजकीय खेळी आहे. शिवसेनेबरोबर सरकार चालवीत असल्याने त्यांचा हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आदी ज्येष्ठ मंत्र्यांनी शिवसेनेबरोबर समझोता करून सरकार सुरळीत चालविण्यासाठी पावले टाकावीत, अशी सूचना केली आहे. पंतप्रधान मोदी, अध्यक्ष अमित शहा यांचा शिवसेनेवर कायमच राग राहिला आहे. पण फडणवीस यांनी शिवसेनेच्या मदतीने सरकार चालविण्याची भूमिका घेतली होती. शिवसेनेविरोधात संघर्ष विकोपाला जाण्याआधी व युती शिवसेनेने तोडली असली तरी भाजपने वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, हे दाखविण्यासाठी शिवसेनेचा अंदाज घेऊन दोन-तीन ज्येष्ठ मंत्र्यांमार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचा भाजपचा विचार आहे.

महापौरपद शिवसेनेकडे ठेवून स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला मिळावे, अशी मागणी त्यात प्रामुख्याने राहील. जर या मुद्दय़ावर सहमती होऊ शकली, तर पुढे अन्य समित्यांच्या वाटपाचा विचार होऊ शकतो. पण शिवसेनेचे संख्याबळ अपक्षांच्या मदतीने ९० पर्यंत गेल्याने आणि काँग्रेसकडून उमेदवार उभा करून मतविभागणीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष मदत होणार असल्याने शिवसेना महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद भाजपची मदत न घेताजिंकून दाखविणार आहे.

भाजपकडून मराठी उमेदवार?

शिवसेनेला भ्रष्टाचारी ठरवून भाजपने आरोप केले व जनतेने भाजपविरोधात शिवसेनेला मते दिली, त्यामुळे आता भाजपला बाजूला ठेवून सत्ता मिळवून दाखवायची आणि त्यानंतर राज्य सरकारमध्येही भाजपला त्रास देत रहायचे, अशी शिवसेनेची भूमिका राहण्याची चिन्हे आहेत. तडजोडीचा प्रस्ताव शिवसेनेने धुडकावल्यावर भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीत शुक्रवारी रात्री पक्षाचा उमेदवार निश्चित केला जाणार असून मराठी उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापौरपदाकडे शिवसेनेची वाटचाल?

मुंबई : शिवसेनेने मुंबई महापालिकेचे महापौर स्वबळावर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी आज शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ आता ९० एवढे झाले असून भाजपच्या मदतीशिवाय महापौर आणणारच असा विश्वास सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला.

निवडणुकीनंतर भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला पाहिजे अशी भूमिका मांडली होती. आरपीआयचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तशी भूमिका मांडल्यानंतर सेनेने प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आठवले यांचे म्हणणे आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीत भाजपसमोर आता झुकायचे नाही, असा सेना नेतृत्वाचा निर्धार असल्याचे तसेच आम्ही आमच्या ताकदीवर शिवसेनेचा महापौर निवडून आणू अशी भूमिका सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

महापालिका निवडणुकीत शिवसेना ८४, भाजप ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, मनसे ७, सपा ६, एमआयएम २ तर अपक्ष चार असे बलाबल होते. यातील चारही अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असून त्यांची एकत्र नोंदणीही करण्यात आली. तसेच एमआयएमच्या एका नगरसेवकाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी व सपाने  भाजप व शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे तर मनसेने आपला पत्ता अद्यापि खुला केलेला नाही. तथापि भाजपला पाठिंबा देणे मनसेला  परवडणारे नसल्याचे मनसेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. युतीबाबत शिवसेनेकडून अद्यापि भाजपकडे कोणताही प्रस्ताव गेलेला नाही अथवा बोलणी झालेली नाहीत.