एमआयएमने खाते उघडले, सपाने अस्तित्व राखले

शिवसेनेची साथ सोडून व भाजपशी हातमिळवणी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला मुंबई व अन्य महापालिका निवडणुकांमध्येही सपाटून मार खावा लागला. मुंबईत भाजपने अभूतपूर्व यश मिळविले, परंतु रिपाइंला त्याचा काहीही फायदा झाला नाही.

या निवडणुकीत एमआयएमचा बराच बोलबाला झाला होता,  मात्र या पक्षाची मजलही तीन जागा जिंकण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. मुंबई महापालिकेत या पक्षाने खाते उघडले एवढीच काय ती जमेची बाजू. समाजवादी पक्षाच्या जागा घटल्या, तरीही सहा प्रभागात विजय मिळवून आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. भारिप-बहुजन महासंघप्रणित लोकशाही-डावी आघाडी, बसप आणि अन्य रिपब्लिकन गटही भुईसपाट झाले आहेत.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने शिवसेना-भाजपबरोबर युती केली होती. त्या वेळी रिपाइंची प्रामुख्याने शिवसेनेशी युती होती, त्यामुळे शिवशक्ती-भीमशक्तीची बरीच हवा तयार करण्यात आली होती. रिपाइंला २९ जागा सोडल्या होत्या, परंतु कसाबसा एक उमेदवार निवडून आला. शिवशक्तीने त्या वेळी रिपाइंला साथ दिली नाही. या वेळी फक्त भाजपशी (संघशक्तीशी) युती केली होती, परंतु १३ जागा लढवूनही रिपाइंचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र भाजपच्या यशात रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे, असा दावा त्यांनी केला. तर भाजपने खऱ्या अर्थाने साथ दिली असती, तर रिपाइंच्याही पाच-सहा जागा निवडून आल्या असत्या, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी व्यक्त केली.

मागील निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाचा एक उमेदवार निवडून आला होता. या वेळी ५० जागा वढविल्या होत्या, मात्र सर्वत्र पराभव पत्करावा लागला. अकोला महापालिकेत मात्र पक्षाने आपले अस्तित्व कायम राखले आहे. बसपला नागपूर, सोलापूरमध्ये काही जागांवर यश मिळाले, परंतु मुंबईत १०९ जागा लढवूनही अपयशच पदरी पडले. अर्जुन डांगळे यांच्या रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने शिवसेनेबरोबर युती केली होती. त्यांचे मुंबई, पुणे व नाशिक या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन उमेदवार निवडून आले आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच निवडणुका लढविल्या होत्या.

  • विधानसभा निवडणुकीत दोन आमदार निवडून आल्यामुळे एमआयएमचा बराच गाजावाजा झाला होता. मात्र मुंबईत ५६ जागा लढवून आणि प्रचारात जोरदार हवा निर्माण करूनही या पक्षाला केवळ तीन जागांवर विजय मिळाला आहे.
  • अल्पसंख्याकबहुल भागात एमआयएम व समाजवादी पक्ष यांच्यात चुरस होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत समाजवादी पक्षाच्या जागा घटल्या आहेत. मात्र तरीही सहा जागांवर विजय मिळवून या पक्षाने महापालिकेतील आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
  • मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट एकमेकांच्या विरोधात लढल्यामुळे आंबेडकरी चळवळीचा प्रभाव असणाऱ्या भागातही सर्वानाच पराभव पत्करावा लागला आहे.