मुख्यमंत्र्यांची तोफ ; राज्यातील सरकार पडणार नसल्याचा विश्वास
मुंबईत महापालिकेने केलेल्या कामांचे श्रेय घेत असाल, तर महापालिकेतील भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घ्याच, अशी तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर डागत, निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी सरकार पडणार नाही, याबद्दल मी निश्चिंत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपला स्वबळावर सत्तास्थापनेसाठी यश मिळेलच, पण ते न मिळाल्यास सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला तरी पारदर्शी व भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर तडजोड न करता विरोधी पक्षात बसू, असे परखड मतप्रदर्शन फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.
बिहारी व उत्तर भारतीयांवर गेली अनेक वर्षे हल्लाबोल करणारे शिवसेना नेते आता मतांसाठी बदलले, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. सरकार सध्या ‘नोटीस’ कालावधीवर आहे, असे सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले. मुंबईसह काही महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत याबाबत विचारता, ठाकरे यांची ‘नोटीस’ मला मिळालेली नाही व ‘शिवसेना सरकारमधून आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडणार नाही’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. सध्या तरी शिवसेना आमच्याबरोबर आहे. मुंबईत भाजपची एकहाती सत्ता आली नाही, तरी शिवसेना हा जुना मित्रपक्ष असल्याने महापालिकेच्या सत्तेत सहभागी होण्याचा पर्यायही आम्हाला खुला आहे, मात्र पारदर्शक कारभाराच्या अटी मान्य असतील तरच ते शक्य होईल असेही ते म्हणाले. मी काही ‘भविष्यकार’ नाही, पण सरकार गडगडणार नाही व मध्यावधी निवडणुकांचे स्वप्न बघणाऱ्यांना मनातच मांडे खात बसावे लागेल, असा टोला फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला. मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असताना प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांच्या फैरी भाजपने झाडल्या आणि पारदर्शी कारभाराच्या व भ्रष्टाचारविरहित कारभाराच्या मुद्दय़ावरून ही निवडणूक लढविली. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, महापालिकेतील निविदा प्रक्रियेत कामाची किंमत ठरविणे व अन्य बाबींमध्ये स्थायी समितीचा संबंध येतो. सात वर्षांच्या लेखापरीक्षणांना मंजुरी दिलेली नाही. या सर्व बाबींची जबाबदारी नगरसेवकांची आहे. भ्रष्टाचारासाठी केवळ प्रशासनाला जबाबदार ठरवून चालणार नाही. भ्रष्टाचाराची व तो रोखण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वानेही स्वीकारली पाहिजे. महापालिकेच्या कामांचे श्रेय घेत असाल, तर भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घेतलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी ठाकरे यांना जोरदार ठणकावले. राज्याचा किंवा नगरविकास विभागाचा प्रमुख म्हणून महापालिकेला निर्देश देण्याचे अधिकार असले तरी पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करण्याची माझी भूमिका नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांनी राज्यघटनेतील तरतुदी समजून घ्याव्यात
राज्य सरकारच्या कारभारात पारदर्शीपणा आणण्यासाठी व भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त, विरोधी पक्षनेते, प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी यांना प्रवेश देण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे. त्यावर ‘ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढविलेली नसल्याने त्यांना भारतीय राज्यघटना व कायदेशीर तरतुदींची माहिती नाही,’ असे खडेबोल सुनावत, ‘राज्य सरकारचा कारभार घटनेतील तरतुदीनुसार चालतो व तो सर्व राज्यांसाठी समान असतो. ज्यांनी पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली आहे, त्यांनाच मंत्रिमंडळ बैठकीत हजर राहता येते. बैठकीचे विषय काही दिवस आधी मंत्र्यांच्या विचारार्थ पाठविले जातात व ते निर्णय होईपर्यंत गोपनीय असतात. त्या विषयांमध्ये कोणाचेही अन्य हितसंबंध येऊ नयेत, यासाठी ही तरतूद आहे. त्यामुळे इतरांना बैठकीत प्रवेश देता येणार नाही,’ असे फडणवीस म्हणाले.
उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका बदलली
शिवसेनेने गेली अनेक वर्षे मराठीच्या मुद्दय़ावर राजकारण केले. बिहारी व उत्तर भारतीयांविरोधात आंदोलने केली. पण निवडणुकीत मतांसाठी भूमिका बदलून बिहार व बिहारींचे कौतुक केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तामिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची चाचपणी शिवसेना करीत आहे व अन्य राज्यांत विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे, याविषयी विचारता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रादेशिक पक्षांना आपल्या राज्यापुरती स्वतंत्र भूमिका घेता येते. मात्र भाषा व अन्य मर्यादांमुळे प्रादेशिक पक्षांना अन्य राज्यांमध्ये फारसा विस्तार करता येत नाही. समाजवादी पक्ष अन्य राज्यांमध्ये किती वाढू शकला? शिवसेना रालोआतून बाहेर पडणार नाही.
मुख्यमंत्री उवाच
- भाजपशी युतीत शिवसेना २५ वर्षे सडली, तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती तुटण्याआधी ठाकरे यांनीच ‘युतीत उत्तम संवाद आहे, सर्व काही छान चालले आहे,’ असे वक्तव्य ‘सामना’मधील मुलाखतीत कसे केले? तेव्हा सेना सडली नव्हती?
- मराठीच्या मुद्दय़ावर मराठी मतदार मते देत नाहीत, हे आता शिवसेनेच्या लक्षात आले असावे
- शिवसेनेशी वैचारिक किंवा तात्त्विक मतभेद, मात्र आमचा जुना मित्रपक्ष
- निवडणुकीची जबाबदारी माझीच, माझ्या नावावर व सरकारच्या कामगिरीवर प्रचाराची आखणी करण्याचा विचारपूर्वक निर्णय पक्षाने घेतला.
सोमय्यांनी कागदपत्रे दिल्यास चौकशी -मुख्यमंत्री
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सात बोगस कंपन्यांमध्ये आर्थिक अफरातफर (मनी लॉण्डरिंग) करून गुंतवणूक केल्याच्या आरोपाबद्दलची कागदपत्रे संबंधित यंत्रणेकडे दिल्यास त्यांच्याकडून उचित चौकशी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र सोमय्या यांनी या बाबींचा राजकीय उपयोग करू नये, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे यांच्या संपत्तीबाबत सवाल करून काही बोगस कंपन्यांमध्येही पैसे गुंतविल्याचे आरोप सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यासंदर्भात खासगी दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना आर्थिक अफरातफर झाली असल्यास त्याची त्या यंत्रणेकडून चौकशी होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
