पराभवाची चाहूल लागल्याने मुख्यमंत्र्यांचा तोल ढळला – देसाई

‘नोटाबंदीमुळे तुमचा काळा पैसा किती बुडाला,’ असा थेट सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीवरच ‘शरसंधान’ केल्याने शिवसेना नेते संतप्त झाले आहेत. ‘‘पराभवाची चाहूल लागल्याने मुख्यमंत्र्यांचा तोल ढळला आहे,’’ असा  टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागल्याने उभय पक्षांमध्ये कटुता वाढत असून त्याचे पडसाद राज्य सरकारमध्येही उमटण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेकडून महापालिकेतील सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. शिवसेनेची ही ताकद खच्ची केल्यास राज्यात यशस्वी घोडदौड पुढील काळात करता येईल, अशी भाजपची रणनीती आहे, तर ठाकरे यांनीही सर्व प्रतिष्ठा पणाला लावून स्वबळावर शिवसेनेची सत्ता मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शिवसेनेलाच संपविण्याचे भाजपचे मनसुबे असल्याने ठाकरे हे भाजपवर नाराज असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनाच सुरुवातीपासून ‘लक्ष्य’ केले आहे.

भाजपने काही काळ ही टीका सहन केली. मात्र ठाकरे यांच्या टीकेची धार वाढतच चालल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘काळ्या पैशांच्या’ मुद्दय़ालाच हात घालून ठाकरे यांनाच लक्ष्य केले. ज्या राजकीय नेत्यांचा काळा पैसा बुडाला, त्यांनी नोटाबंदीला विरोध केला आहे. त्यामुळे तुम्हाला किती फटका बसला, असा जळजळीत सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांना केल्याने आणि आता त्यांच्या संपत्तीवरच शरसंधान केल्यावर ठाकरे यांना प्रत्युत्तर देणे कठीण होईल, अशी भाजपची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे किंवा काळा पैसा असल्याचे थेट आरोप अद्याप झालेले नाहीत. ठाकरे यांच्यावरच थेट भ्रष्टाचार किंवा काळ्या पैशांचे आरोप केल्यास त्याचा भाजपला फायदा होईल, अशी  व्यूहरचना भाजपने केली आहे.

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवरच

सर्वोच्च नेत्यावर आरोप होऊ लागल्याने शिवसेनेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. भाजपला उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यांबरोबरच मुंबई महापालिकेतही पराभवाची चाहूल लागली आहे.मुंबईतील पराभवाचे खापर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच फुटणार असल्याने ते हवालदिल झाले आहेत आणि आता ठाकरे यांच्यावर काळा पैसा व अन्य मुद्दय़ांवर वैयक्तिक टीका करू लागल्याचा टोला उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी लगावला आहे.

या वेळी फडणवीस हे काळ्या पैशांच्या मुद्दय़ावरून ठाकरे यांच्यावरच घसरल्याने शिवसेनेने ते अधिक गांभीर्याने घेतले असून त्याचे तीव्र पडसाद लवकरच उमटतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.