मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. चार अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याने शिवसेनेचे संख्याबळ ८८ झाले आहे. तर भाजपकडे एक अपक्ष असल्याने त्यांचे संख्याबळ ८३ वर पोहोचले आहे. सत्तेसाठी ११४ हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. त्यामुळे आकडयांच्या जुळवाजुळवीला वेग आला आहे.
महापालिकेच्या निकालानंतर शिवसेना ८४, भाजप ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ०९, मनसे ७ असे चित्र आहे. तर एमएमआय २, समाजवादी पक्ष ६, अभासे १, अपक्ष ५ अशी स्थिती आहे. महापालिकेत शिवसेना भाजपने युती केल्यास स्पष्ट बहुमत असेल. गेली २० वर्षे महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता होती. मात्र महापालिका निवडणुकीत २५ वर्षांची दोस्ती तोडून शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले. निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भाषा खूपच घसरली. प्रचारादरम्यान भाजपचे सर्व नेते शिवसेनेवर तुटून पडले होते. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांचे संबंध छगन भुजबळ यांच्या मनिलॉन्डरिंग प्रकरणाशी जोडले होते. त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे.
युती तुटल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारीच्या सभेत केली. युतीत राहिल्याने शिवसेनेची २५ वर्षे सडली, असा प्रहार ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे शिवसेना भाजपला बरोबर घेणार का ?, याबाबत शंकाच आहे. स्नेहल मोरे, किरण लांडगे, तुळशीराम शिंदे आणि चंगेज मुलतानी हे चार अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे सेनेचे संख्याबळ ८८ वर पोहचले आहे. त्यामुळे शिवसेनेला बहुमतासाठी २६ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपच्या गळाला एक अपक्ष लागल्याने त्यांची संख्या ८३ झाली आहे. त्यामुळे भाजपला जादुई आकडा गाठण्यासाठी ३१ नगरसेवकांची गरज आहे.
मुंबईतील सत्तेसाठी शिवसेना व भाजप दोघानीही इतर पर्यायांचा अवलंब करावा लागणार आहे. समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपबरोबर जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेना जो पर्यंत राज्याच्या सत्तेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम यांची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही. त्यामुळे मुंबईत कोणाचा महापौर होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.