मुंबई : अदानी समूहाची ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली अदानी पॉवरने गेल्या महिन्यात १:५ या प्रमाणात समभाग विभाजनाची (स्टॉक स्प्लिट) घोषणा केली आहे. म्हणजेच पात्र भागधारकांकडे असलेला एक समभाग आता पाच समान भागांमध्ये विभागला जाईल. अदानी पॉवरच्या भागधारकांनी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका समभागाचे प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या पाच समभागांमध्ये विभाजन करण्यास मान्यता दिली आहे.

कंपनीने २२ सप्टेंबर, २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच २२ सप्टेंबरपर्यंत कंपनीचे समभाग हाती असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील प्रत्येक समभागामागे कंपनीचे पाच समभाग प्राप्त होतील. समभाग विभाजनानंतर, त्यांची संख्या २,४८० कोटींवरून १२,४०० कोटींपर्यंत वाढेल.

कंपनीने तिच्या इतिहासात पहिल्यांदाच समभाग विभाजन केले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देत त्यांचा सहभाग वाढावा. त्यांना गुंतवणूक करण्यासाठी समभाग अधिक परवडणारे बनविण्यासाठी आणि कंपनीच्या समभागांची तरलता वाढविण्यासाठी समभाग विभाजनाला मान्यता देण्यात आली आहे. शुक्रवारच्या सत्रात अदानी पॉवरचा समभाग १ रुपयांनी वधारून ६०९.७० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २,३५,१५७ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

आता किती समभाग होणार?

जर एखाद्या भागधारकाकडे अदानी पॉवरचे प्रत्येकी १०० रुपये किमतीचे १० समभाग असतील, तर समभाग विभाजनानंतर त्याच्याकडे कंपनीचे ५० समभाग असतील. समभाग विभाजनानंतर प्रत्येक शेअरची किंमत २० रुपये असेल. मात्र, त्याच्याकडील एकूण समभागांची किंमत १००० रुपये कायम राहील. त्यानंतर समभागांच्या बाजारभावानुसार त्यात वध-घट होईल.

समभाग विभाजन म्हणजे काय?

समभाग विभाजन म्हणजे एका समभागांचे समान भागात विभाजन केले जाते. यामुळे कंपनीचे दर्शनी मूल्य कमी होत असले तरी विभाजन झाल्याने महागडा वाटणारा समभाग आवाक्यात येतो. उदा दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागाचे विभाजन दोन भागात करण्यात आले तर भागधारकांच्या खात्यात त्या कंपनीचे ५ रुपये दर्शनी मूल्य असलेले दोन समभाग जमा होतील. शिवाय कंपनीच्या समभागाचे बाजारमूल्य सुद्धा निम्मे होईल.

कंपनीची कामगिरी कशी?

अदानी पॉवरची स्थापना १९९६ मध्ये झाली होती आणि वर्ष २००९ मध्ये शेअर बाजारांमध्ये समभाग सूचिबद्ध करण्यात आले. विद्यमान आर्थिक वर्षाच्या जून अखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा १३.५ टक्क्यांनी घसरून ३,३८४ कोटी रुपयांवर आला आहे. दरम्यान, कंपनीचा महसूल ६ टक्क्यांनी घसरून १४,१०९ कोटी रुपये झाला आहे. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत अदानी पॉवर लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा ५ टक्क्यांनी कमी होऊन २,५९९ कोटी रुपयांवर पोहोचला होता.