मुंबईः वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीत सुधारणांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक येत्या आठवड्यात, ३ आणि ४ सप्टेंबरला होत आहे. राज्याच्या अर्थमंत्र्यांचा सहभाग असणाऱ्या या बैठकीतून, ५ टक्के आणि १८ टक्क्यांच्या कराची द्विस्तरीय रचनेसह, अनेक वस्तूंच्या किमती ओसरणार आहेत. विशेषत: या कर कपातीतून चार चाकी मोटारी आणि दुचाकींच्या किमतीत जवळपास ८ टक्के आणि स्मार्टफोन ते टीव्हीपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंना किमती १० टक्क्यांनी घसरण्याचा फायदा मिळेल.

मात्र हा कर कपातीचा निर्णय येण्याआधी ग्राहकांनी खरेदी थांबविल्याचे, वाहन निर्मात्या कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या मासिक विक्रीतील घसरलेल्या आकड्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले.

सर्वाधिक खपल्या जाणाऱ्या स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकल अर्थात एसयूव्ही श्रेणीतील वाहनांची अग्रणी निर्मात्या महिंद्र अँड महिंद्रने ऑगस्टमध्ये तीन वर्षांत पहिल्यांदाच विक्रीत घट नोंदवली. या स्कॉर्पिओ उत्पादक कंपनीने स्पष्ट केले की, घटलेल्या कराच्या निर्णयाची वाट पाहत असताना डीलर्सना नियंत्रित स्वरूपात वाहने सरलेल्या महिन्यांत धाडण्यात आली. ऑगस्ट महिन्यात महिंद्रच्या एसयूव्ही विक्रीत ९ टक्के घट झाली आहे. तरी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत तिने साधलेली विक्रीतील वाढ ही १५ टक्क्यांच्या घरात जाणारी आहे.

गणेशोत्सवापासून सुरू होणारा सणासुदीचा हंगाम हा वाहन विक्रीसाठी वर्षातील सर्वोत्तम काळ असतो. मात्र जीएसटी कपातीपश्चात कमी किमतीची खरेदीदार अपेक्षा करत असल्याने ही सणोत्सवी खरेदी यंदा त्यांनी लांबवली असल्याचे मुंबईतील महिंद्रच्या नामांकित डीलरने सांगितले. जीएसटी सुधारणांच्या संबंधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी घोषणा केली, पण अंतिम निर्णय येण्यास विलंब झाल्यास सणोत्सवी खपाच्या हंगामावर पाणी फिरेल, अशी वितरक, विक्रेत्यांना चिंता आहे. याच चिंतेतून अंतिम निर्णय लवकरात घेऊन, त्याच्या अंमलबजावणीसाठी देखील सरकारने घाई करावी, अशी फेडेरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने यापूर्वीच सरकारकडे केली आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक या आठवड्याच्या अखेरीस बुधवार (३ सप्टेंबर) आणि गुरुवारी (४ सप्टेंबर) अशी दोन दिवस सुरू राहणार आहे. या करप्रणालीतील सर्वोच्च निर्णायक मंडळ असलेल्या या परिषदेची यंदाची ही ५६ वी बैठक असून, गत सात वर्षातील या करप्रणालीच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या फेरबदलावर या बैठकीत चर्चा होणार आहे. यातून सध्या २८ टक्क्यांच्या सर्वोच्च कराच्या कक्षेत असलेल्या दुचाकी व प्रवासी मोटारी या १८ टक्क्यांच्या कक्षेत येणे अपेक्षित आहे.

जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या वाहन बाजारपेठेत, ऑगस्टमध्ये विक्रीत घसरणीचा फटका या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझूकी, ह्युंडाई मोटर्स, टाटा मोटर्स यांनाही बसला. मारुतीने ऑगस्टमधील तिच्या विक्रीत ८ टक्क्यांची घसरण झाल्याचे सांगितले आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये कंपनीने तिच्या डिलर्सना १ लाख ४३ हजार वाहनेच रवाना केली.

जीएसटी कपातीचा मारुतीच्या डिझायर, इग्निस, अल्टो आणि एस-प्रेसो छोट्या व मध्यम श्रेणीतील प्रवासी वाहनांना सर्वाधिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. ऑगस्टमध्ये तिच्या याच वाहनांची खरेदी घटल्याचे चित्र होते. प्रवासी वाहन निर्मातीतील मारुती, महिंद्रच्या स्पर्धक ह्युंडाई मोटर्स इंडियाची विक्री ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी घटून, ४४,००१ वर सीमित राहिली. टाटा मोटर्सनेही ७ टक्क्यांची घट नोंदविली.

दुचाकींच्या क्षेत्रात, बजाज ऑटोला विक्रीत १२ टक्के घसरणीचा फटका बसला. टीव्हीएस मोटर्स आणि रॉयल एनफिल्डच्या निर्मात्या आयशर मोटर्स यांनी मात्र ऑगस्टमध्ये त्यांनी डिलर्सना रवाना केलेल्या दुचाकींचे प्रमाण वार्षिक तुलनेत अनुक्रमे २८ टक्के आणि ५७ टक्क्यांनी वाढल्याचे नमूद केले.