लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली ३० सप्टेंबर २०२३ ही अंतिम मुदत, त्या आधीच आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे गुरुवारीच (२८ सप्टेंबर) संपुष्टात येणार असून, त्या मुदतीत वाढ केल्याचे मध्यवर्ती बँकेने तूर्त तरी जाहीर केलेले नाही. सलग सुट्यांमुळे बँकांची सेवा सलग चार दिवस बंद राहणार असल्याने जनसामान्यांचाही अन्य अनेक बाबतीत खोळंबा होणार आहे.

चालू आठवड्यात गुरुवारी २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असूनही बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. मात्र शुक्रवारी २९ सप्टेंबरला ईद ए-मिलादची राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केल्याने बँका बंद असतील. त्याला जोडूनच, शनिवारी ३० सप्टेंबरला बँकांचा आर्थिक वर्षाचा सहामाही बंद असल्याने ग्राहकांना त्या दिवशी बँकांचे व्यवहार करता येणार नाहीत. त्या पुढे १ ऑक्टोबरला रविवार आणि २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने सलग चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

बँकांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत चलनातून परत मिळालेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.३२ लाख कोटी आहे. परिणामी, ३१ ऑगस्ट २०२३ रोजी व्यवसायाच्या समाप्तीपर्यंत दोन हजारांच्या सुमारे २४ हजार कोटींच्या नोटा अजूनही चलनात होत्या. मात्र सलग सुट्यांमुळे बँकांचे कामकाज बंद राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, बुधवार सायंकाळपर्यंत तरी रिझर्व्ह बँकेने नोटा बदलासाठी मुदतवाढ दिल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही.

पगार खोळंबणार?

बहुतांश पगारदारांचे वेतन कंपन्यांकडून १ तारखेला केले जाते. मात्र आता १ आणि २ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुटी आल्याने ते देखील लांबणार आहे. परिणामी नागरिकांना त्यानुसार आपले आर्थिक नियोजन करावे लागेल. विशेषत: ज्यांचा कर्जाचा हप्ता हा महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना तशी तरतूद करावी लागेल अन्यथा भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. शिवाय चार दिवस बँका बंद असल्याने नागरिकांना एटीएमवर अवलंबून राहावे लागेल. बँकांकडून एटीएमध्ये पुरेशी रोकड उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र तसे न झाल्यास एटीएमवर देखील ताण येण्याची शक्यता आहे. तथापि यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन पेमेंट म्हणजेच नेटबँकिंग आदीच्या माध्यमातून व्यवहार करता येणेही शक्य आहे.