मुंबई : मुख्य बाजार मंचावरील जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रारंभिक समभाग विक्रीला गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. बुधवारी खुला झालेल्या आयपीओसाठी पहिल्या तासातच चारपट भरणा झाला आहे.
जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओसाठी किरकोळ आणि बिगर-संस्थागत गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, कंपनी आयपीओच्या माध्यमातून ४६०.४३ कोटी रुपयांचा निधी उभारू इच्छित आहे. मात्र आयपीओला दुपारी १:१५ वाजेपर्यंत ४.२९ पट प्रतिसाद प्राप्त झाला आहे. बिगर-संस्थागत गुंतवणूकदारांकडून जोरदार मागणी दिसून आली, त्यांच्यासाठी राखीव भागासाठी ८.२० पट मागणी आली आहे, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव भागासाठी ५ पट अधिक मागणी नोंदवली गेली. मात्र पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी असलेल्या राखीव हिश्शयाला केवळ ७ टक्के प्रतिसाद लाभला आहे.
जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ २३ जुलैपासून खुला झाला असून गुंतवणूकदारांना २५ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. कंपनीने आयपीओसाठी २२५ ते २३७ रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) येत्या ३० जुलैला समभाग सूचिबद्ध होणार आहे. सुमारे ४६०.४३ कोटी रुपयांची निधी उभारणी होणार असून, ज्यामध्ये ४०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांचा आणि भागधारकांकडील सुमारे ६०.४३ कोटी रुपये मूल्याचे समभाग आंशिक समभाग विक्रीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओमधून उभा राहणारा निधी मुख्यतः कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यापैकी ३२० कोटी रुपये कंपनी आणि तिची प्रमुख उपकंपनी, इलेक्ट्रॉनिक्स बाजार एफझेडसीने घेतलेल्या काही थकित कर्जांची परतफेड आणि अग्रिम देणी फेडण्यासाठी वापरले जातील. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी राखीव ठेवण्यात येईल. मंगळवारच्या सत्रात सुकाणू गुंतवणूकदारांकडून १३८ कोटी रुपयांची निधी उभारणी करण्यात आली आले. जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या नूतनीकरणात गुंतलेली आहे, ज्याचे कामकाज भारत, अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये चालते.
जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सचे समभाग ३० जुलैला मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध होणार आहे, तर त्याआधी २८ जुलै रोजी गुंतवणूकदारांना समभागांचे वाटप अपेक्षित आहे.
ग्रे बाजारात किती मागणी?
ग्रे बाजारामधील क्रियाकलापांचा मागोवा घेणाऱ्या मंचानुसार, जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सचा समभाग १०५ रुपयांच्या अधिमूल्यावर व्यवहार करत आहे, जे किंमत पट्ट्याच्या वरच्या किमतीपेक्षा सुमारे ४४.३ टक्के अधिक वाढ दर्शवते.