मुंबई: नव्या पिढीचा गुंतवणूक मंच असलेल्या ‘ग्रो’ची पालक कंपनी असलेल्या ‘बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स’च्या समभागांनी बुधवारी शेअर बाजारात पदार्पणालाच दमदार ३१ टक्क्यांची मुसंडी मारली. गेल्या आठवड्यातील ‘आयपीओ’पश्चात ग्रोचे समभाग गुंतवणूकदारांना प्रत्येकी १०० रुपये किमतीला वितरित केले गेले होते, मात्र बुधवारी समभागांच्या सूचिबद्धतेनंतर मुंबई शेअर बाजारात त्यांनी १४ टक्के अधिमूल्यासह व्यवहाराला सुरुवात केली आणि १३४.४० रुपयांचा उच्चांकही अल्पावधीत दाखविला.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात समभाग वितरीत किमतीच्या तुलनेत प्रत्येकी सुमारे ३१ रुपयांचा फायद्यासह, ग्रोचा समभाग १३०.९४ रुपयांवर स्थिरावला. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या कंपनीच्या भागविक्रीला गुंतवणूकदारांनी १७.६० पट असा उमदा प्रतिसाद दिला होता. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, कंपनीचे ८०,८३७.०७ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.
बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्सने ३ नोव्हेंबर रोजी सुकाणू गुंतवणूकदारांकडून २,९८४ कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती. कंपनीने आयपीओसाठी प्रति समभाग ९५ रुपये ते १०० रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला होता. वर्ष २०१६ मध्ये स्थापन झालेले, ग्रो भारतातील सर्वात मोठी दलाली पेढी म्हणून उदयास आली आहे. जून २०२५ पर्यंत १.२६ कोटींहून अधिक तिचे सक्रिय ग्राहक असून कंपनीने २६ टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सा व्यापला आहे.
