मुंबई: नव्या पिढीचा गुंतवणूक मंच असलेल्या ‘ग्रो’ची पालक कंपनी असलेल्या ‘बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स’च्या समभागांनी गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात मुसंडी मारली. दिवसापूर्वी सूचिबद्धतेला समभाग १७ टक्क्यांहून अधिक वधारला होता, तर दोन सत्रात मिळून त्याने गुंतवणूकदारांना ४८ टक्क्यांचा परतावा दाखविला आहे.
बुधवारी भांडवली बाजारात नव्याने पदार्पण केलेल्या ‘ग्रो’च्या समभागाने मुंबई शेअर बाजारात गुरुवारी १५३.५० या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दिवसअखेर समभाग ४.८४ टक्क्यांनी वधारून १३७.६९ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, कंपनीचे बाजारभांडवल ८५,००४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अलिकडच्या काळातील हा गुंतवणूकदारांसाठी सर्वात लाभदायी ‘आयपीओ’ ठरला आहे.
गेल्या आठवड्यातील ‘आयपीओ’पश्चात ग्रोचे समभाग गुंतवणूकदारांना प्रत्येकी १०० रुपये किमतीला वितरित केले गेले. मात्र बुधवार आणि गुरुवार अशा सुरुवातीच्या दोन सत्रात समभागाने ४८ टक्क्यांहून अधिक लाभ गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे.
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या कंपनीच्या भागविक्रीला गुंतवणूकदारांनी १७.६० पट असा उमदा प्रतिसाद दिला होता. बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्सने ३ नोव्हेंबर रोजी सुकाणू गुंतवणूकदारांकडून २,९८४ कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती. कंपनीने आयपीओसाठी प्रति समभाग ९५ रुपये ते १०० रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला होता.
वर्ष २०१६ मध्ये स्थापन झालेले, ग्रो भारतातील सर्वात मोठी दलाली पेढी आणि गुंतवणूक व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. जून २०२५ पर्यंत १.२६ कोटींहून अधिक तिचे सक्रिय ग्राहक असून कंपनीने २६ टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सा व्यापला आहे.
ग्रोने उपलब्ध करून दिलेल्या ग्राहकसुलभ मोबाईल ॲप आणि वेबसाइट हे एक परिपूर्ण गुंतवणूक मंच असून, त्यावरून विविध वित्तीय साधनांची खरेदी-विक्री केली जाते. ज्यामध्ये शेअर्स, म्युच्युअल फंड, ईटीएफ, आयपीओ आणि डेरिव्हेटिव्ह व्यवहारांचा समावेश आहे. १०० टक्के कागदरहित खाते उघडण्याची तंत्रज्ञानसुलभ जलद प्रक्रिया, सोपे आलेख आणि अन्य साधनांच्या आधारे पोर्टफोलिओ अर्थात गुंतवणूक भांडाराचे नेटके विश्लेषण आणि मूल्यांकनाची सोय हे ग्रोचे वैशिष्ट्य ठरले आहे.
सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड ग्रोच्या मंचावर उपलब्ध असून, एकरकमी थेट गुंतवणूक किंवा किमान १०० रुपयांपासून नियमित शिस्तबद्ध धाटणीची ‘एसआयपी’ गुंतवणुकीची सोय त्याने उपलब्ध करून दिली आहे. गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त ग्रोकडून पत-सुविधाही दिली जाते, त्यासाठी कंपनीची स्वतंत्र बँकेतर वित्तीय सेवा उपकंपनी आहे. संपत्ती व्यवस्थापन आणि कमॉडिटीमध्ये ट्रेडिंगची सुविधा कंपनीने खुली केली आहे.
