नवी दिल्लीः देशातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन ऑगस्टमध्ये १.८६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत त्यात ६.५ टक्के वाढ नोंदविण्यात आल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून समोर आले.

देशातील जीएसटी संकलन यंदा जुलै महिन्यात १.९६ लाख कोटी रुपये होते. याचबरोबर यंदा एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन २.३७ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण जीएसटी महसूल २२.०८ लाख कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये हा महसूल ११.३७ लाख कोटी रुपये होता. हा महसूल ५ वर्षांत दुपटीने वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात सरासरी जीएसटी संकलन १.८४ लाख कोटी रुपये झाले. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ते १.६८ लाख कोटी रुपये होते.

याविषयी केपीएमजीचे भागीदार अभिषेक जैन म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत जीएसटी संकलन स्थिर आहे. मात्र, परतावा वितरणाचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. जीएसटीच्या दर टप्प्यांमध्ये बदल होणार असल्याने आगामी काळात त्याचा संकलनावर काय परिणाम होते, हे पाहावे लागेल. याचबरोबर ऑनलाइन गेमिंगवरील बंदीमुळे त्याचा फटकाही संकलनाला बसणार आहे.

देशभरात १.५१ कोटी करदाते

देशात जीएसटी लागू झाल्यापासून याअंतर्गत नोंदणी करणाऱ्या करदात्यांची संख्या वाढत आहे. सुरूवातीला २०१७ मध्ये ६५ लाख करदाते होते. मागील आठ वर्षांत करदात्यांची संख्या १.५१ कोटींवर गेली आहे.

कर कपातीकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात जीएसटीमध्ये सुधारणा आणि कर कपातीची घोषणा केली होती. ही दिवाळी भेट असेल, असे त्यांनी म्हटले होते. सरकारने जीएसटी २.० प्रस्तावित केली असून, त्यात कराचे ५ आणि १८ टक्के असे दोनच टप्पे असतील. दैनंदिन वापरातील वस्तूंना ५ टक्के आणि इतर उत्पादनांना १८ टक्के कर आकारणी केली जाईल. यातून जीएसटी प्रणालीमध्ये सुटसुटीतपणा येण्यास मदत होणार आहे.