पीटीआय, नवी दिल्ली : गेल्या तीन महिन्यांतील सुमार कामगिरी नोंदविताना देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ सप्टेंबरमध्ये ३ टक्क्यांवर रोखली गेली आहे. आठ प्रमुख उद्योगांचा विकासदर याआधीच्या म्हणजेच ऑगस्टमध्ये ६.५ टक्के नोंदवला गेला होता, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजेच सप्टेंबर २०२४ मधील २.४ टक्क्यांच्या तुलनेत उत्पादन वधारले आहे.
सप्टेंबरमध्ये चार ऊर्जा क्षेत्रांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे प्रमुख क्षेत्रांची वाढ खुंटली आहे. पायाभूत सुविधांवर आधारित उद्योगांनी चांगली कामगिरी केली, तर ऊर्जा क्षेत्रांनी नकारात्मक विकास दर नोंदवला. ऑगस्टमध्ये सकारात्मक कामगिरी केल्यानंतर, सप्टेंबरमध्ये कोळशाचे उत्पादन (-१.२ टक्के), खनिज तेल (-१.३ टक्के) आणि तेल शुद्धीकरण (-३.७ टक्के) घटले. नैसर्गिक वायू उत्पादन (-३.८ टक्के) सलग पंधराव्या महिन्यात घसरले, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
चार पायाभूत सुविधा क्षेत्रांपैकी, पोलाद उत्पादनात १४.१ टक्क्यांनी वाढ झाली – सलग तिसऱ्या महिन्यात दुहेरी अंकी वाढ झाली, जी वाढलेल्या सरकारी भांडवली खर्चामुळे आणि बांधकाम क्षेत्राकडून वाढलेल्या मागणीचे प्रतिबिंब दर्शवते. उर्वरित पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये खते (१.६ टक्के), सिमेंट (५.३ टक्के) आणि वीज (२.१ टक्के) क्षेत्रातील उत्पादन वाढले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल-सप्टेंबर) प्रमुख क्षेत्रांची वाढ २.९ टक्क्यांवर मर्यादित आहे. जी गेल्या वर्षी एप्रिल-सप्टेंबर या काळात ४.३ टक्के होती.