मुंबई : देशातील आघाडीची माहिती-तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसची १८,००० कोटी रुपयांची समभाग पुनर्खरेदी योजना येत्या २० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, पात्र भागधारकांना त्यात २६ नोव्हेंबरपर्यंत सहभागी होता येईल.
समभाग पुनर्खरेदीसाठी (बायबॅक) कंपनीने १,८०० रुपये प्रतिसमभाग किंमत निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किंवा लहान भागधारकांसाठी समभाग पुनर्खरेदी योजनेचे प्रमाण २:११ म्हणजेच त्यांच्याकडील प्रत्येक ११ समभागांमागे दोन समभागांची पुनर्खरेदी केली जाईल. तसेच संस्थात्मक आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, हे प्रमाण १७:७०६ म्हणजेच रेकॉर्ड तारखेला ज्या भागधारकांकडे ७०६ समभाग असतील त्यातील १७ समभागांची पुनर्खरेदी केली जाईल. कंपनीने या योजनेत भागधारकांच्या पात्रतेसाठी १४ नोव्हेंबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. ज्या भागधारकांकडे दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी मूल्याचे समभाग असतील ते किरकोळ गुंतवणूकदार म्हणून गृहीत धरले जातील. सेबीच्या नियमांनुसार, कंपन्यांना एकूण समभाग पुनर्खरेदीतही ठरावीक हिस्सा किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीसाठी राखीव ठेवावा लागतो.
वर्ष २०२२ नंतर इन्फोसिसकडून जाहीर केलेली ही पहिली पुनर्खरेदी योजना आहे, त्यावेळी कंपनीने ९,३०० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले होते. गेल्या दशकभरात कंपनीने केलेली ही सर्वात मोठी आणि पाचवी समभाग पुनर्खरेदी योजना आहे.
समभाग पुनर्खरेदीवर करभार
पूर्वी शेअर बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) कंपन्यांनी पुनर्खरेदी केलेल्या शेअरवर झालेल्या भांडवली नफ्यावर गुंतवणूकदारांना कर भरावा लागत नव्हता. शेअर पुनर्खरेदीमध्ये गुंतवणूकदाराला जरी कर भरावा लागत नव्हता तरी, कंपन्यांना मात्र या व्यवहारावर २० टक्के दराने कर भरावा लागत होता. गेल्यावर्षी १ ऑक्टोबर २०२४ पासून समभागाच्या पुनर्खरेदीवरील कर आकारणीत बदल करण्यात आला आहे. कंपन्यांकडून समभागाच्या पुनर्खरेदीवर मिळालेली संपूर्ण रक्कम ही लाभांश म्हणून समजण्यात येईल. या रकमेतून समभाग खरेदी किंवा इतर खर्चाची वजावट मिळणार नाही. या लाभांशावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल.
