मुंबई: सत्रारंभ वाढीसह करून भांडवली बाजारात सेन्सेक्स-निफ्टी हे प्रमुख निर्देशांक शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात आपटले. अमेरिकेने लादलेल्या तीव्र दंडात्मक आयात शुल्काचे बाजारावरील भयगंडाने सुरू असलेल्या विक्रीत गुंतवणूकदारांनी तीन सत्रात मिळून ११.२१ लाख कोटी रुपये गमावले आहेत.
शुक्रवारचे बाजारातील व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स २७०.९२ अंशांच्या (०.३४ टक्के) घसरणीसह ७९,८०९.६५ वर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक ७४.०५ अंशांच्या (०.३० टक्के) नुकसानीसह २४,४२६.८५ पातळीवर स्थिरावला.
ऑगस्टमधील हे बाजारातील व्यवहाराचे शेवटच्या सत्र होते. सेन्सेक्स-निफ्टीसाठी हा सलग दुसरा घसरणीचा महिना राहिला. भारतीय वस्तूंवरील अमेरिकेच्या दंडात्मक शुल्कामुळे आर्थिक विकास आणि निर्यातीला फटका बसण्यासह कंपन्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. यातून ऑगस्टच्या सुरुवातीला कमावलेले सर्व गमावून सेन्सेक्सचा मासिक तोटा १.७ टक्के राहिला.
मागील तीन सत्रांतील पडझडीत निर्देशांकांनी जवळपास अडीच टक्के नुकसानीचा मार सोसला आहे. सेन्सेक्सने तीन दिवसांत १,८२६.२६ अंश गमावले, तर निफ्टी निर्देशांक ५४०.९० अंशांनी धुपून गेला आहे. जुलैमध्ये देखील निर्देशांकांची मासिक घसरण सुमारे ३ टक्क्यांची राहिली आहे.
गुंतवणूकदारांना प्रतीक्षा असलेल्या जिओच्या आयपीओची घोषणा आणि कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात नवीन कंपनीसह पाऊल टाकण्याच्या मुकेश अंबानी यांच्या घोषणेनंतरही रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग शुक्रवारी २.२१ टक्क्यांनी गडगडून १,३५७.०५ वर स्थिरावला. महिंद्र अँड महिंद्र देखील २.९६ टक्क्यांनी आपटला.
इन्फोसिस, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टेक महिंद्र हे अन्य घसरलेले समभाग होते. १६ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १२ निर्देशांक गडगडले. बीएसई मिडकॅप ०.४१ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.२९ टक्क्यांनी घसरला. लार्ज कॅपच्या तुलनेत व्यापक बाजारात घसरणीचे प्रमाण माफक होते. परिणामी मुंबई शेअर बाजारातील २,१८७ शेअर्स घसरणीत राहिले, तर १,८९० शेअर्स वाढले.
रुपया पहिल्यांदाच ८८ च्या वर
शुक्रवारी रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आणि पहिल्यांदाच तो प्रति डॉलर ८८ च्या वर गेला. डॉलरच्या तुलनेत रुपया ५१ पैसे गडगडून ८८.०९ वर बंद झाला. दिवसातील त्याची ०.६५ टक्के ही जवळजवळ तीन महिन्यांतील सर्वात मोठी दैनिक घसरण आहे. सत्रादरम्यान त्याने ८८.३० या सार्वकालिक नीचांकाला लोळण घेतली होती. या पातळीवर रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केल्याची शक्यता असून, त्यामुळे रुपया काहीसा सावरू शकला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्रीने तीव्र रूप धारण केली आहे.
ऑगस्टमध्ये त्यांनी बाजारातून ३.३ अब्ज डॉलर काढून घेतले आहेत, जे फेब्रुवारीनंतरचे सर्वात मोठे बहिर्गमन आहे. शुक्रवारच्या सत्रात तर त्यांनी सरासरीपेक्षा किती तरी जास्त ८,८०० कोटी रुपयांच्या वर विक्री केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्युच्युअल फंडांसह, देशांतर्गत वित्तीय संस्थांनी मोठी खरेदी केल्याने, निर्देशांकांतील घसरणीचे प्रमाण परिणामी माफक राहिले. गुरुवारीही विदेशी गुंतवणूकदारांकडून ३,८५६.५१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री झाली होती, तर देशी संस्थांनी ६,९२०.३४ कोटी रुपयांची खरेदी केली होती.