मुंबई: आघाडीचा बाजार मंच असलेल्या मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसई लिमिटेडने मंगळवारी पूर्वघोषित एकास-दोन बक्षीस समभाग (२:१) योजनेसाठी येणारी २३ मे ही ‘रेकॉर्ड तारीख’ घोषित केली आहे. याचा अर्थ त्या तारखेला अथवा त्या आधी ‘बीएसई’चे भागधारक म्हणून नोंद असलेले बक्षीस समभागांसाठी पात्र मानले जाईल. कंपनीने ‘रेकॉर्ड तारखे’ची घोषणा केल्यानंतर बुधवारच्या सत्रात ‘बीएसई’चा समभाग सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचला.

कंपनीच्या संचालक मंडळाने ३० मार्च रोजी एकास दोन बक्षीस समभाग (२:१ बोनस शेअर) देण्यास मान्यता दिली. बक्षीस समभाग मंजुरीच्या तारखेपासून म्हणजे दोन महिन्यांच्या आत म्हणजेच २६ मे २०२५ पर्यंत समभाग भागधारकांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. बीएसईकडून भागधारकांना बक्षीस समभाग देण्याची ही गेल्या तीन वर्षातील दुसरी वेळ असेल. मार्च २०२२ मध्ये बीएसईने २:१ समभाग म्हणजेच धारण केलेल्या प्रत्येक एका समभागामागे दोन बक्षीस समभाग भागधारकांना दिले आहेत.

समभागाची कामगिरी कशी?

बक्षीस समभागासाठी ‘रेकॉर्ड तारखे’च्या वृत्तानंतर बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा समभाग ०.४३ टक्क्यांनी म्हणजेच ३१.५० रुपयांनी वधारून ७,३४७ रुपयांवर बंद झाला. बीएसईच्या समभागाने बुधवारच्या सत्रात ७,४२२.५० रुपये ही ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली. सध्याच्या शेअरच्या बाजार भावानुसार, बीएसईचे ९९,४६१ कोटींचे बाजार भांडवल आहे. लवकरच बीएसई एक लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात समभाग १७३ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. तर गेल्या आठवड्यात समभागाने १०.४४ टक्क्यांची कमाई केली आहे.