मुंबई: राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाने (एनयूसीएफडीसी) नागरी सहकारी बँकांचा नफा पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांनी दिली. केंद्रीय सहकार मंत्रालयाने यावर्षीच नागरी सहकारी बँकांसाठी ‘एनयूसीएफडीसी’ ही शिखर संस्था (अम्ब्रेला ऑर्गनायझेशन) स्थापित केली आहे. मेहता म्हणाले की, महामंडळाकडून पुढील काही महिन्यांत नवीन उत्पादने सादर केली जाणार असून, त्यामुळे नागरी बँकांना नियमनाचे पालन करण्यास मदत होईल. पुढील पाच वर्षांत नागरी सहकारी बँकांचा नफा दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य आहे. सध्या १९७ बँका शिखर संस्थेचा भाग आहेत. देशभरात जवळपास दीड हजार नागरी सहकारी बँका कार्यरत असून, त्या सर्वांना सामावून घेण्यास खूप कालावधी लागेल. एकाच शिखर संस्थेच्या अंतर्गत या सर्व बँकांना आणणे आव्हानात्मक आहे. नागरी सहकारी बँकांतील ठेवींच्या वाढीचा दर सध्या ४ टक्के असून, तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : आरटीजीएस, एनईएफटी व्यवहार आता अधिक सुरक्षित! पैसे पाठविताना लाभार्थ्याच्या नावाची पडताळणी एप्रिलपासून सक्तीची

शिखर संस्थेकडून मार्च २०२५ पासून बँकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याचबरोबर सायबर सुरक्षेसह इतर बाबींसाठी तंत्रज्ञानाचे पाठबळ दिले जाणार आहे. कोअर बँकिंग संगणक प्रणाली ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू केली जाणार आहे. सध्या नागरी सहकारी बँकांची सायबर सुरक्षा कमकुवत असून, त्यांचा माहिती तंत्रज्ञानावरील खर्च वाढण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिखर संस्थेकडून माहिती-तंत्रज्ञान हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जुलै २०२५ मध्ये मध्यवर्ती स्तरावर उपलब्ध केले जाणार आहे. शिखर संस्था एकूण ३०० कोटी रुपयांचा निधी उभारणार असून, त्यापैकी ११८ कोटी उभारण्यात आले आहेत. उरलेला निधी ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उभारला जाणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nucfdc aims to double the profit of urban co operative banks in the next five years print eco news css