मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कर्ज वाटपात सरलेल्या एप्रिल-जून तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ नोंदवली आहे. बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यात सुस्पष्ट आघाडी घेतली आहे.
एकीकडे कर्ज वाटपात वाढ होत असली तरी काही बँकांकडील ठेवींमध्येही मोठी वाढ झाली असून, सध्याच्या प्रवाहाप्रमाणे कर्ज वाटपाच्या तुलनेत ठेवींमधील वाढीचे प्रमाण अधिक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अर्थात महाबँकेने पहिल्या तिमाहीत १५.३६ टक्क्यांनी कर्ज वाढ नोंदवली असून, बँकेने एकूण कर्ज वितरण २.४१ लाख कोटी रुपये झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस थकीत कर्ज २.०९ लाख कोटी रुपये होते, असे बँकेने म्हटले आहे. याच तिमाहीत एकूण ठेवींमध्ये १४.०८ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३.०९ लाख कोटी रुपये झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस २.६७ लाख कोटी रुपये होती.
परिणामी, बँकेचा एकूण व्यवसाय (एकूण कर्ज आणि ठेवी) १४.६४ टक्क्यांनी वाढून ५.४६ लाख कोटी रुपये झाला आहे, जो ३० जून २०२४ च्या अखेरीस ४.६७ लाख कोटी रुपये होता. नवीन तिमाहीत, चालू खाते आणि बचत खाते (कासा) प्रमाण एकूण ठेवींच्या तुलनेत ५०.०७ टक्क्यांचे आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ४७.८६ टक्के होते.
यूको बँकेने देखील जूनअखेर सरलेल्या तिमाहीत १६.५८ टक्के कर्जवाढ नोंदवली आहे. बँकेची वितरीत कर्जे २.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस वितरीत कर्ज १.९३ लाख कोटी रुपये होती. तर बँकेच्या एकूण ठेवींमध्ये ११.५७ टक्के वाढ झाली आहे, जी पहिल्या तिमाहीच्या अखेरीस २.६८ लाख कोटी रुपये होती. बँकेचा एकूण व्यावसाय १३.६७ टक्क्यांनी वाढून ५.२४ लाख कोटी रुपये झाला आहे. यापाठोपाठ पंजाब नॅशनल बँकेने कर्ज वाटपात ९.७ टक्के वाढ नोंदवली आहे.
तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्ज वाटप आणि ठेवींमध्ये संमिश्र वाढ दर्शविली, सीएसबी बँकेने पहिल्या तिमाहीत कर्ज आणि ठेवींमध्ये उच्च वाढ नोंदवली. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेच्या ठेवी पहिल्या तिमाहीत अवघ्या ५.१ टक्क्यांनी वाढल्या, तर कर्ज वितरणातील वाढ केवळ ०.४ टक्के इतकीच आहे.