मुंबई : कर कपात आणि ग्रामीण भागातील मागणी वाढल्याने यंदाच्या सणोत्सवाच्या ४२ दिवसांत तब्बल ५२ लाख इतक्या विक्रमी संख्येने मोटारींची विक्री झाली. वार्षिक तुलनेत ही वाढ २१ टक्क्यांची असून, दसरा आणि दिवाळी आलेल्या ऑक्टोबरमधील विक्रीतील वाढ तर तब्बल ४०.५ टक्के अशी दमदार राहिली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ या वाहन विक्रेत्यांच्या संघटनेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने हे स्पष्ट केले.

यंदाच्या सणोत्सवात दर दिवसाला सरासरी १.२३ लाख वाहनांच्या विक्रीचा अभूतपूर्व विक्रम नोंदला गेला. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कपात २२ सप्टेंबरपासून लागू झाली असली, तरी या कपातीनुरूप किमतीतील सूट अनेक वाहन उत्पादकांनी काही दिवस आधीपासून सुरू केली, त्याचा एकंदर विक्रीतील लक्षणीय वाढीचा हा परिणाम दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे ग्रामीण भागातील कार विक्री ही शहरी भागाच्या तुलनेत तिप्पट वेगाने वाढली, तर दुचाकी वाहनांची विक्री दुप्पट वेगाने वाढली, असे ‘फाडा’ची ही आकडेवारी सांगते.

‘फाडा’चे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या सणोत्सवात ग्रामीण भागातील बळावलेल्या भावना, लोकांहाती खुळखुळता पैसा आणि जीएसटी कपातीने साधलेल्या परवडण्याजोग्या किमतीचा परिणाम यामुळे एकंदर वाहन विक्रीने ऐतिहासिक पातळी गाठली. ऑक्टोबरमधील सार्वकालिक उच्चांकी मासिक विक्री पाहता, वाहन विक्रेत्यांनी अलिकडच्या काळातील सर्वोत्तम उत्सवी हंगाम म्हणून त्याचे वर्णन केले, असे विघ्नेश्वर यांनी नमूद केले.

सणांच्या एकूण हंगामात दुचाकी विक्रीत २२ टक्के वाढ आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत २३ टक्क्यांची वाढ दिसून आली. ऑक्टोबरमध्ये दुचाकींची विक्री तर तब्बल ५२ टक्क्यांनी वाढून ३१,४९,८४६ युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात २०,७५,५७८ युनिट्स इतकी होती.

प्रवासी वाहनांव्यतिरिक्त, ऑक्टोबरमध्ये तीन चाकी वाहनांच्या किरकोळ विक्रीत देखील वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढ होऊन ती १,२९,५१७ युनिट्सवर पोहोचली, तर वाणिज्य वापराच्या वाहनांच्या विक्रीत गेल्या महिन्यात वार्षिक तुलनेत १८ टक्क्यांची वाढ झाली.

वाहन विक्रेत्यांमधील ६४ टक्के घटकांना विद्यमान नोव्हेंबरमध्येही विक्री वाढण्याची अपेक्षा आहे, असे फाडाने म्हटले आहे. आगामी लग्नांचा हंगाम, कापणीतून ग्रामीण भागात वाढणारा पैशाचा प्रवाह आणि वाहन कंपन्यांकडून नव्याने दाखल होणारी वाहने हे घटक वर्ष सांगतेच्या महिन्यांतही विक्रीतील गती टिकवून ठेवतील, असा ‘फाडा’चा अंदाज आहे.