नवी दिल्ली : मजबूत आर्थिक मूलतत्वे असलेला भारत हा आजच्या अस्थिर जगात स्थिरतेचा स्तंभ बनला आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ‘कौटिल्य आर्थिक परिषदे’त बोलताना शुक्रवारी केले.
अलिकडच्या वर्षातील आर्थिक सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था ७-८ टक्के वाढीचा दर टिकवून ठेवू शकते. मध्यवर्ती बँकेचे प्राथमिक लक्ष्य किंमत स्थिरता आहे, बरोबरीनेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मल्होत्रा म्हणाले. दोनच दिवसांपूर्वी, रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज सुधारून घेत ६.८ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
कमी महागाई, पुरेसा परकीय चलन साठा, चालू खात्यातील कमी झालेली तूट आणि बँका आणि कंपन्यांच्या अतिशय मजबूत ताळेबंद या घटकांना देशाची मजबूत मूलतत्वे अबाधित राखण्याचे श्रेय मल्होत्रा यांनी दिले. हे केंद्र सरकारचे, धोरणकर्ते, नियामक आणि नियंत्रित संस्थांचे एकत्रित प्रयत्न आहेत. एकंदरीत, बाह्य अडचणी वाढल्या असूनही, अर्थव्यवस्था कणखरपणे वाढीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
हे निश्चितच एक मोठे यश आहे. म्हणूनच अस्थिर जगात भारत स्थिरतेचा स्तंभ बनून उभा आहे, असे मल्होत्रा म्हणाले. गेल्या दशकातील आर्थिक आव्हानांचा विचार करताना मल्होत्रा म्हणाले, गेल्या पाच वर्षांत पुरवठा साखळीतील धक्क्यांमुळे अर्थव्यवस्थेला जखमा झाल्या आहेत. करोना साथीचा काळ, रशिया-युक्रेन संघर्ष वगैरेचा त्यांनी या संदर्भात उल्लेख केला. मुख्यत: बाह्य धक्के आणि पुरवठा बाजूच्या महागाईला तोंड देण्यासाठी पतविषयक उपाय कुचकामी ठरल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.
रिझर्व्ह बँकेकसाठी एक महत्त्वाचा धडा म्हणजे संकटाच्या वेळी पुरवठा आणि मागणी बाजूच्या हस्तक्षेपांसाठी सुव्यवस्थित धोरणांची आखणी करणे. या स्थितीतून मार्ग काढत महागाई दर ४ टक्के या सहनशील पातळीच्या मर्यादेत राखण्यास रिझर्व्ह बँकेला यश आले. मात्र जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे आर्थिकदृष्ट्या प्रत्येक देश तणावाखाली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.