पीटीआय, नवी दिल्ली

देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी विद्यमान वर्षात ३१ जुलैपर्यंत १२ उद्योग क्षेत्रांमध्ये उत्पादन संलग्न प्रोत्साहन अर्थात ‘पीएलआय’ योजनेअंतर्गत आतापर्यंत २१,६८९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती मंगळवारी संसदेत देण्यात आली.

देशाच्या उत्पादन क्षमतेत वाढ आणि निर्यातीला चालना म्हणून १.९७ लाख कोटी रुपयांच्या खर्चासह दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स, औषध निर्माण, कापड आणि वाहन उद्योगासह १४ प्रमुख क्षेत्रांसाठी ‘पीएलआय’ योजना २०२१ मध्ये जाहीर करण्यात आली. योजनेंतर्गत ३१ जुलै २०२५ पर्यंत १२ क्षेत्रांसाठी २१,६८९ कोटी रुपयांची एकत्रित प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात आली, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी लोकसभेत दिली.

या १४ क्षेत्रांमध्ये १.७६ लाख कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे, ज्यामुळे १६.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादन/विक्री वाढली आहे आणि १२ लाखांहून अधिक रोजगार (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या) निर्माण झाल्या आहेत. योजनेच्या पहिल्या तीन वर्षांत औषधनिर्माण क्षेत्रातून २.६६ लाख कोटी रुपयांची एकत्रित विक्री आणि १.७० लाख कोटी रुपयांची निर्यात शक्य झाली आहे, असे प्रसाद म्हणाले. या योजनेमुळे २०२१-२२ मध्ये निव्वळ आयातदार (१,९३० कोटी रुपये) असलेला भारत आता औषधांचा निव्वळ निर्यातदार बनण्याच्या संक्रमणास हातभार लागला असल्याचे त्यांनी नमूद केले.

पीएलआय योजनेसाठी पात्र म्हणून १४ क्षेत्रातून ८०६ अर्ज मंजूर केले गेले आहेत, असे प्रसाद यांनी सांगितले. मंजूर अर्जांची सर्वाधिक संख्या अन्न उत्पादन विभागामधून (१८२) आहे, त्यानंतर स्पेशालिटी स्टील (१०९), वाहने (९५), वस्त्रोद्योग (७४), उपकरणे (६६) आणि औषध निर्माण (५५) असा विविध क्षेत्रांचा क्रम लागतो.

मोबाईल फोनच्या क्षेत्रात, मूल्याच्या बाबतीत उत्पादन २०२०-२१ मधील २,१३,७७३ कोटी रुपयांवरून, २०२४-२५ मध्ये ५,२५,००० कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच सुमारे १४६ टक्क्यांनी वाढले आहे. मोबाइल फोनची निर्यात २०२०-२१ मधील २२,८७० कोटी रुपयांवरून, २०२४-२५ मध्ये सुमारे ७७५ टक्क्यांनी वाढून २,००,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, आयटी हार्डवेअर, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि औषधनिर्माण यासह १२ क्षेत्रांसाठी पीएलआय योजनेअंतर्गत ३१ जुलैपर्यंत २१,६८९ कोटी रुपयांची एकत्रित प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात आल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.