पीटीआय, नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने त्यांच्या निधी व्यवस्थापन क्षेत्रातील उपकंपनी एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडमधील (एसबीआयएफएमएल) सुमारे ६ टक्के हिस्सा प्रारंभिक समभाग विक्री – ‘आयपीओ’च्या माध्यमातून विकण्यास गुरुवारी मान्यता दिली.

एसबीआय म्युच्युअल फंडच्या प्रायोजकांपैकी एक असलेली एसबीआयएफएमएल ही एसबीआय कार्ड्स आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्सनंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी स्टेट बँक समूहातील तिसरी उपकंपनी असेल. स्टेट बँकेने आयपीओच्या माध्यमातून ३.२० कोटी समभाग विकण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच सुमारे ६ टक्के हिस्सेदारी विकण्यात येईल.

एसबीआयएफएमएलचा दुसरा प्रवर्तक अमुंडी इंडिया होल्डिंग १.८८ कोटी समभाग विकणार आहे, जे एसबीआयएफएमएलच्या एकूण भांडवलाचा ३.७० टक्के हिस्सा आहे. दोन्ही प्रमुख भागधारक एकूण १० टक्के हिस्सा आयपीओच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडचा आयपीओ आगामी २०२६ सालात येण्याची शक्यता आहे. एसबीआय म्युच्युअल फंडची स्थापना १९८७ मध्ये झाली असून, जवळपास १२ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह ते देशातील सर्वात मोठे फंड घराणे आहे.

सध्या, स्टेट बँक आणि अमुंडी इंडिया होल्डिंग यांची एसबीआयएफएमएलमध्ये अनुक्रमे ६१.९१ टक्के आणि ३६.३६ टक्के हिस्सेदारी आहे. एसबीआयएफएमएल ही देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे, तिने १५.५५ टक्के बाजारहिस्सा व्यापला आहे. एसबीआयएफएमएलचा आयपीओ विद्यमान भागधारकांसाठी मूल्य प्राप्ती वाढवण्याव्यतिरिक्त हा आयपीओ सामान्य भागधारकांसाठी संधी निर्माण करेल, बाजारातील सहभाग वाढवेल, असे स्टेट बँकेचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी म्हणाले.

एसबीआय म्युच्युअल फंडाचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४,२३०.९२ कोटी रुपये होते, जे स्टेट बँक समूहाच्या एकूण उत्पन्नाच्या ०.६४ टक्के आहे.