मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक तेजीवर स्वार झाले असताना दुपारच्या सत्रात झालेला नफावसुलीमुळे सेन्सेक्स इंट्राडेतील उच्चांकावरून ८०० अंकांनी घसरून ८४,५५६.४० वर पोहोचला. तर निफ्टी देखील २६,००० अंशाच्या पातळीवर टिकून राहू शकला नाही. याबरोबर जागतिक पातळीवर संमिश्र संकेत आणि खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने बाजारात वाढ मर्यादित राहिली.
बाजारातील घसरणीमागील प्रमुख कारणे
१) उच्चांकी पातळीवर नफावसुली: सत्राच्या सुरुवातीला नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गुंतवणूकदार नफावसुलीकडे वळले, ज्यामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली.
२) खनिज तेल पुन्हा तेजीत: जागतिक पातळीवर ब्रेंट क्रूड २.५६ टक्क्यांनी वधारून ६४.१९ डॉलर प्रतिपिंपावर व्यवहार करत होते. तेलाच्या किंमत वाढीचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला.
३) मिश्र जागतिक संकेत: जागतिक शेअर बाजारांना फारसा आधार मिळाला नाही, बहुतेक आशियाई बाजारात घसरण झाली. जपानचा निक्केई २२५, शांघायचा एसएसई कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक नकारात्मक पातळीवर व्यवहार करत स्थिरावले. अमेरिकी बाजार नकारात्मक क्षेत्रात बंद झाले, ज्यामुळे देशांतर्गत आघाडीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा मार्ग अवलंबला
४) अस्थिरता निर्देशांक: अस्थिरता दर्शवणारा व्हीआयएक्स निर्देशांक ३.३ टक्क्यांनी वधारून ११.७३ वर पोहोचला. अधिक अस्थिरता बाजारात अल्पकालीन अनिश्चितता दर्शविते.
तांत्रिक विश्लेषक काय सांगते?
निफ्टीला २५,४०० ते २५,५०० हा एक महत्त्वाचा आधार आहे. जो सकारात्मक बाजार भावना आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून आवक यांच्यात सतत वरच्या दिशेने वाटचालीसाठी एक मजबूत आधार प्रदान करतो.