मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारातील ‘ब्लू-चिप’ कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या नफावसुलीने तेजीला लगाम लावला. मुख्यतः रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांमधील विक्रीमुळे सेन्सेक्स-निफ्टीची सलग चार सत्रांत सुरू राहिलेली तेजी खंडित झाली.
अत्यंत अस्थिर वाटचाल राहिलेल्या सत्रात, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५३.०९ अंशांनी घसरून ८१,७७३.६६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८२,२५७.७४ चा उच्चांक आणि ८१,६४६.०८ चा नीचांक गाठला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६२.१५ अंशांची घसरण झाली आणि तो २५,०४६.१५ पातळीवर बंद झाला.
सलग चार सत्रातील तेजीनंतर गुंतवणुकीदारानी केलेल्या नफावसुलीमुळे बाजारात घसरण झाली. कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन आणि वाढीच्या शक्यतांचे पुनर्मूल्यांकन केल्यामुळे दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या कामगिरीच्या हंगामापूर्वी गुंतवणूकदार सावध बनल्याचे दिसून आले, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, सन फार्मा, पॉवर ग्रिड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज घसरणीस कारणीभूत ठरले. तर टायटन, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्र हे सकारात्मक पातळीवर स्थिरावले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) मंगळवारी निव्वळ खरेदीदार बनले आणि त्यांनी १,४४०.६६ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
शेअर बाजार आकडेवारी
सेन्सेक्स ८१,७७३.६६ -१५३.०९
निफ्टी २५,०४६.१५ -६२.१५
तेल ६६.२१ १.१६ टक्के
डॉलर ८८.८० ३ पैसे