लोकांच्या पसंतीस उतरलेले डिजिटल देयक माध्यम ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’ व्यवहारांची स्वीकारार्हता भारतातच नव्हे, भारताबाहेरही वाढत आहे. पंख पसरलेल्या ‘यूपीआय’ सेवेने आता नवीन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत कतारमध्ये प्रवेश केल्याचे बुधवारी अधिकृत सूत्रांतून स्पष्ट करण्यात आले. अशा सेवेला स्वीकृती दर्शविणारे कतार हा आठवा देश आहे.
एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि कतार नॅशनल बँकेच्या भागीदारीतून, पॉइंट-ऑफ-सेल (पॉस) टर्मिनल्सद्वारे कतारमध्ये क्यूआर कोड-आधारित यूपीआय देयकांना स्वीकारले जाणार आहे. यामुळे भारतीय पर्यटक, प्रवाशांना प्रमुख पर्यटन स्थळे आणि कतार शुल्क मुक्त (ड्यूटी फ्री) विक्री दालनांच्या ठिकाणी ‘यूपीआय’च्या माध्यमातून खरेदी व्यवहार पूर्ण करता येईल, असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सांगितले.
कतारला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक पर्यटक हे भारतीय आहेत. या भागीदारीमुळे कतारमध्ये देशभरात रिअल-टाइम व्यवहार करण्यास मदत होईल, ज्यामुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज कमी होईल. शिवाय चलन विनिमयातील अडचणी दूर होऊन, त्यावरील खर्चही कमी होईल. कतारमध्ये यूपीआय देयक स्वीकारल्याने इंटर-ऑपरेबिलिटीला चालना मिळेल आणि यूपीआयची जागतिक स्वीकारार्हता वाढेल. या सुविधेचा कतारच्या किरकोळ विक्री आणि पर्यटन क्षेत्रालाही फायदा होण्याची अपेक्षा आहे.
जागतिक स्तरावर यूपीआयची स्वीकृती वाढवणे आणि खरोखरच इंटर-ऑपरेबल जागतिक देयक जाळे भारतीयांसाठी तयार करणे हे ‘एनपीसीआय’चे ध्येय आहे. कतार नॅशनल बँकेसोबतची भागीदारी हे त्या प्रवासाच्या दिशेने एक पाऊल आहे, असे एनपीसीआय इंटरनॅशनलचे व्यवथापकीय संचालक आणि मुख्याधिकारी रितेश शुक्ला म्हणाले. या आधी फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात (युएई), सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मॉरिशसमध्ये यूपीआय व्यवहार स्वीकारले जातात. या यादीत उत्तरोत्तर नवनवीन देशांची भरच पडत आहे. तसेच ब्रिटन, ओमान आणि जपानमधील काही व्यापाऱ्यांकडे यूपीआयच्या माध्यमातून देयके स्वीकारली जातात.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)द्वारे विकसित केली गेलेली ‘यूपीआय’ प्रणालीने रोकडरहित डिजिटल देयक व्यवहार सोपे, जलद आणि सुरक्षित बनले आहे. भारतातील त्याचा वाढता वापर पाहता, त्याने आर्थिक व्यवहारात क्रांतीच घडवून आणली आहे. यूपीआयची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे म्हणजे, वापरास सोप्या स्मार्टफोनवर आधारीत या प्रणालीद्वारे पैसे त्वरित एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित होत असतात. मुख्यत: बँक-ते-बँक (पी२पी) आणि व्यक्ती-ते-व्यापारी (पी२एम) व्यवहार त्वरित आणि सुरक्षितपणे करता येतात.